Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk यांनी जेव्हा काही काळासाठी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असल्याचा मान गमावला…!  

एलॉन मस्क

Image Source : www.haber7.com

ट्विटर खरेदीमुळे पडलेला अतिरिक्त भार आणि टेस्लाच्या शेअरमध्ये झालेली घसरण यामुळे एलॉन मस्क यांची जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही काळ घसरण झाली होती. त्यांची जागा नेमकी कुणी घेतली पाहूया…

ट्विटर (Twitter) आणि टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी काल (8 डिसेंबर 2022 ला) काही काळासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं आपलं बिरुद गमावलं होतं. फोर्ब्स ही मीडिया कंपनी जगातल्या अब्जाधीश लोकांची संपत्ती रिअलटाईम (RealTime) मोजते. म्हणजे त्या व्यक्तीची एकूण मालमत्तेची (Net Worth) नोंद क्षणा क्षणाला होत राहते. मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा फटका त्यांना या आठवड्यात बसला. आणि त्यांची घसरण झाली.      

51 वर्षीय मस्क यांची काही तासांसाठी का होईना जागा घेतली ती फ्रेंच उद्योजक बर्नाड आरनॉल्ट (Bernard Arnault) यांनी. आरनॉल्ट हे लुई व्हिटॉ या जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँडचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीचं नाव आहे LVMH. आरनॉल्ट यांच्या मालमत्तेचं मूल्य तेव्हा 185.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं झालं होतं. पण, काही वेळाने मस्क यांनी त्यांना पुन्हा मागे टाकलं. आणि त्यांची मालमत्ता 185.7 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली.         

एलॉन मस्क यांनी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पहिल्यांदा सप्टेंबर 2021मध्ये पटकावला. आणि त्यानंतर ते या जागेवर अढळ होते. त्यांनी अॅमेझॉन कंपनीचे जेफ बेझॉस यांना या जागेवरून खाली खेचलं होतं.         

2022मध्ये मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट झाली आहे. टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे यावर्षी आतापर्यंत त्यांची मालमत्ता 200 अब्ज अमेरिकन डॉलरने जवळ जवळ खाली आली आहे. टेस्लाचे शेअर सध्या दोन वर्षांच्या नीच्चांकावर आहेत.         

टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार (Electric Car) बनवणारी आघाडीची ऑटो कंपनी आहे. पण, कोव्हिड नंतरच्या काळात जगभरातून कारची मागणी कमी झालीय. आणि टेस्लाची मुख्य बाजारपेठ चीनमध्ये तर इलेक्ट्रिक कारची मागणी आणखी खाली गेल्यामुळे टेस्ला कंपनीला फटका बसलाय. आणि सध्या मस्क यांच्या एकूण मालमत्तेत कार उद्योगाचा वाटा सगळ्यात मोठा आहे.         

याशिवाय मस्क यांनी अलीकडेच ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतली. हा व्यवहारही 44 अब्ज अमेरिकन डॉलरचा होता. याचा फटकाही मस्क यांच्या मालमत्तेला बसला आहे. ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांनी तिथल्या 60% नोकऱ्या कमी केल्या. उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि गुंतवणुकदारांनी मस्क यांच्या या धोरणाबद्दलही भीती व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेली गुंतवणूक (Diversification) त्यांना मोबदला मिळवून देईल का याबद्दल तज्ज्ञांना साशंकता वाटते. त्यामुळेही गुंतवणुकदारांचा विश्वास कमी झाला आहे.         

टेस्ला आणि ट्विटर व्यतिरिक्त मस्क यांच्याकडे रॉकेट कंपनी स्पेसएक्स (SpaceX) आणि न्यूरालिंक (NeuraLink) या स्टार्टअप्सचीही मालकी आहे. न्यूरालिंक ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात काम करते.