Money Mistakes to avoid- नव्या वर्षात अनेकजण संकल्प करतात. तसेच नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाही गुंतवणुकीचा आणि आर्थिक शिस्त पाळण्याचा अनेकजण निर्धार करतात. मात्र, हे संकल्प कागदावरच राहतात. योग्य नियोजन आणि अल्प, दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून असाल तर चुका टाळायला हव्यातच. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी तुम्हाला योग्य नियोजन फायद्याचे ठरेल. नाहीतर कमावलेला पैसे उतारवयात शिल्लक राहणार नाही. आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे, ते आपण या लेखात पाहू.
क्रेडिट रिपोर्ट न तपासणं
तुमचा क्रेडिट रिपोर्ट ठराविक कालवधीने तपासत जा. यात तुमच्या खात्यावरील व्यवहार, बँक खात्यांची माहिती, क्रेडिट कार्ड, बँक लोन आणि इतरही माहिती पहायला मिळेल. यामध्ये जर काही चूक असेल तर तुम्ही दुरूस्त करुन घ्या. अनेक वेळा क्रेडिट रिपोर्टमध्ये दुसऱ्याच कोणाचे तरी बँक खाते, क्रेडिट कार्ड तुमच्या खात्याशी जोडले जाते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल. भविष्यात तुम्हाला कर्ज घेण्यास अडचणी येऊ शकतात. कर्जाचे हप्ते शिल्लक आहेत का? हे सुद्धा रिपोर्टमधून कळू शकते. क्रेडिट रिपोर्ट चेक करण्यासाठी अनेक वेबसाइट्स आहेत. क्रेडिट रिपोर्ट खूप दिवस तपासला नाही, तर खात्यावरील चुकीची माहिती तशीच राहून तुमचा स्कोअर खराब होईल.
कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्ड बिल चुकवणं
कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्जचे बिल पेमेंट वेळेवर भरत नसाल तर तुमच्यासाठी रेड अलर्ट आहे. कारण 750 च्या खाली क्रेडिट स्कोअर असेल बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करेल. त्यामुळे बिल पेमेंटसाठी ऑटो डेबिटचा पर्यायही तुम्ही वापरू शकता. ज्याद्वारे तुम्हाला बिल पेमेंटच्या तारखा लक्षात ठेवण्याची गरज नाही. खराब क्रेडिट स्कोअर सुधारण्यास अनेक वर्ष लागतात. त्यामुळे शिस्तीने सर्व बिल वेळेवर भरल्यास तुम्ही अनेक अडचणींपासून वाचाल. गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज क्रेडिट ब्युरोशी लिंक असते. जर तुम्ही हप्ते थकवले तर त्याचा परिणाम क्रेडिट रिपोर्टवर होतो.
भाववाढ लक्षात न घेता निवृत्तीचे नियोजन
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक खर्च मागील चार-पाच वर्षात मोठा वाढला आहे. याची प्रचिती तुम्हाला बाजारात खरेदी करताना दररोज येतच असेल. मग निवृत्तीनंतर महागाई किती वाढलेली असेल याचा विचार करा. निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 60 वर्षानंतर उत्पन्नाचा कोणताही स्रोत तुमच्याकडे नसेल तर महागाईला हरवू शकेल, अशा पर्यायांमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला हवी. ज्यामुळे उतारवयात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
उदाहरणार्थ- जर सद्यस्थितीत तुम्हाला 30 हजार रुपये मासिक खर्च लागत असेल आणि 20 वर्षांनंतर तुम्ही निवृत्त होणार असाल तर तुमचा मासिक खर्च दुपटीपेक्षा जास्त होऊ शकतो. महागाई दर सरासरी 6% इतका गृहित धरला तरी तुम्हाला 20 वर्षानंतर 70 हजारांपेक्षा जास्त रुपये मासिक खर्चासाठी लागू शकतात. त्यामुळे तुमची गुंतवणूक राशी आणि त्यानंतर मिळणारे मासिक उत्पन्न किती असेल हे भाववाढीचा दर लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवा.
कौशल्य विकासावर लक्ष न देणं
21 व्या शतकात कौशल्याआधारित कर्मचाऱ्यांना महत्त्व आले आहे. मग ते अर्थव्यवस्थेचे कोणतेही क्षेत्र असो. सध्या तुम्ही पाहतच असाल जागतिक मंदीची स्थिती निर्माण झाली असून कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात आहे. या काळात तुम्ही नवनवीन कौशल्य आत्मसात करत राहिले पाहिजे. यातून अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही निर्माण होतील. तसेच नोकरी गेल्यानंतर दुसरा जॉब मिळवण्यात अडचण येणार नाही. कंपन्यांनी एकापेक्षा जास्त कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात. यातून तुम्ही आधीच्या पगारापेक्षा जास्त पॅकेज मिळवू शकता. त्यामुळे कौशल्य विकासात आर्थिक बौद्धिक गुंतवणूक करा.
आर्थिक ध्येयाशिवाय गुंतवणूक करणं
जर तुमच्याकडे गुंतवणुकीचे ध्येय आणि नियोजन नसेल तर तुम्ही बाजारातील तात्पुरते ट्रेंड पाहून गुंतवणूक करता. यामुळे तुम्हाला नुकसानही होऊ शकते. तसेच गुंतवणुकीत सातत्य राहत नाही. गुंतवणुकीचे ध्येय आणि जोखीम घेण्याची क्षमता आधी ठरवायला हवी. अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय ठरवून आधी सातत्याने तीन ते पाच वर्ष गुंवतणूक केल्यास तुम्हाला अधिक स्पष्टता येते. गुंतवणुकीची राशी, त्यातून मिळणारा परताव्याचा दर, कालावधी याचा विचार केल्यानंतर एखाद्या पर्यायात गुंतवणूक करावी.
घर, गाडी, शिक्षण, परदेश वारी, व्यवसाय सुरू करणे, मुलांचे शिक्षण, आरोग्य अशा अनेक बाबी तुमच्या बकेटलिस्टमध्ये असू शकतात. यांचा प्राधान्यक्रम लावून त्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात करा. जेवढे लवकर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल, तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्हाला मिळेल. उशीरा सुरू केलेली मोठी गुंतवणूकही मग फायद्याची ठरणार नाही.
कर नियोजनात टाळाटाळ
कमावणारा प्रत्येक व्यक्ती आर्थिक वर्षाच्या शेवटी करबचतीचा प्रयत्न करतो. मात्र, वर्षभर शांत बसून मार्च एंडला गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. त्यापेक्षा कर बचतीसाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच विमा, गुंतवणूक योजना, एसआयपी, टर्म प्लॅन घ्यायला हवा. शेवटच्या घाई करुन चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणुकीची शक्यता वाढते. जर तुम्हाला स्वत: नियोजन करण्यात अवघड वाटत असेल तर तुम्ही कर सल्लागार किंवा सीएची मदत घेऊ शकता. करबचतीसाठी कोणते पर्याय आहेत, त्यास प्राधान्य द्यायला हवे. म्हणजे करही वाचेल आणि भविष्यासाठी गुंतवणुकही होईल.
आर्थिक नियोजनात विम्याचा समावेश न करणं
आर्थिक नियोजनात विम्याचा समावेश अवश्य हवा. त्यात प्रामुख्याने जीवन आणि स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा अत्यंत गरजेचा आहे. कोणतीही आरोग्य आणीबाणी सांगून येत नाही. त्यामुळे कुटुंबियांच्या दीर्घ सुरक्षेसाठी जीवन विमा गरजेचा आहे. आर्थिक जबाबदाऱ्या अंगावर असतील तर कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूने आर्थिक घडी विस्कटू शकते. त्यामुळे पुरेसे जीवन विमा संरक्षण असावे. गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सल्ला आर्थिक सल्लागार देतात. म्हणजेच प्युअर टर्म प्लॅन ज्यामध्ये गुंतवणूक आणि परताव्याचा समावेश नाही, अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. कुटुंबियांसाठी फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसीही घेऊ शकता. मात्र, त्यामध्ये पुरेसे विमा संरक्षण हवे. विमा असल्यामुळे तुम्हाला बचतीमधून पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही.
आणीबाणीसाठी वेगळा निधी
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना त्यासोबत आणीबाणीचेही नियोजन आवश्यक आहे. कारण, आपण जेव्हा पुढे जाण्याचा विचार करतो, त्याचे नियोजन करतो, तेव्हा अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. मग त्यासाठी तुम्हाला पैशांची गरज जरुर लागेल. अचानक नोकरी जाणे, गंभीर आजार होणे, अपघात, कौटुंबिक अडचणी. त्यामुळे मासिक खर्चाच्या सहा महिने पुरेल इतका आणीबाणी निधी जवळ ठेवावा, असा सल्ला जाणकार देतात. तसेच आणीबाणीसाठी फंड असेल तर ऐनवेळी दीर्घकालीन गुंतवणुकीतून पैसे काढण्याची वेळ येणार नाही.