इंडोनेशियाने पाम तेल निर्यात करण्यावर बंदी घातल्याचा भारतावर मोठा परिणाम होणार असून सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत 50 ते 60 टक्के पाम तेल इंडोनेशियातून आयात करतो.
पामतेलाचा वापर कशासाठी केला जातो?
पाम तेलाचा वापर स्वयंपाकाच्या तेलासाठी तर केला जातोच पण त्याचबरोबर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आणि जैवइंधन उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच बिस्किटे, लॉन्ड्री डिटर्जंट आणि चॉकलेटसह अनेक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये पाम तेलाचा वापर केला जातो.
भारतीयांच्या किचनचे बजेट कोलमडणार
इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे बाजारातील चिंता वाढली आहे. भारत पामतेलाचा मोठा आयातदार देश आहे. भारत इंडोनेशियाकडून कच्चे पामतेल तर मलेशियाकडून पक्के पामतेल आयात करतो. इंडोनेशियाच्या पामतेल निर्यात बंदीमुळे भारतीयांच्या किचनचे बजेट कोलमडणार आहे. यापूर्वी भारताला खाद्यतेलाचा पुरवठा विशेषत: सूर्यफूल तेलाचा रशिया आणि युक्रेनसारख्या देशांमधून होत होता. पण या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे सूर्यफुलाच्या तेलाची आयात महाग झाली. भारत इंडोनेशियाकडून पाम तेलाची आयात वाढवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असताना इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने भारताच्या खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महागाई आणखी वाढण्याची शक्यता
इंडोनेशियाने लादलेली निर्यातबंदी कमीतकमी महिनाभर चालू राहू शकते, अशी शक्यता, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. कारण इंडोनेशियाला परकीय चलनाची गरज असल्याने तो देश फार काळ निर्यात बंदी सुरू ठेवणार नाही. दरम्यान अर्जेंटिना देशानेही काही काळासाठी सोयाबीन तेल्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी नंतर उठवण्यात आली. दरम्यान, या कालावधीत भारतात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भारताचा महागाईचा दर सध्या 6 टक्क्यांच्या आसपास असताना आता पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने हा महागाई दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Image Source - https://bit.ly/3kjsYdZ