जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. या घसरलेल्या किंमती लक्षात घेता केंद्रानं खाद्यतेलाच्या दरात 8 ते 12 रुपये प्रतिलिटरनं घट करण्याच्या सूचना तत्काळ प्रभावानं दिल्या आहेत. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे (Ministry of Food Processing Industries) सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं या संदर्भात निर्देश जारी केले आहेत. ज्या कंपन्यांनी त्यांच्या किंमती कमी केल्या नाहीत तसंच त्यांची एमआरपी (Maximum retail price) इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे, त्यांनी तत्काळ आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी कराव्यात, असं अन्न प्रक्रिया मंत्रालयानं म्हटलंय.
Table of contents [Show]
घसरणीचा कल कायम
मॅन्यूफॅक्चरर आणि रिफायनरनं वितरकाला देऊ केलेल्या किंमतीही तत्काळ प्रभावानं कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे किंमतीतलं असंतुलन कमी होईल. मंत्रालयानं म्हटलंय, की खाद्यतेलाच्या किंमतीतल्या घसरणीचा कल कायम आहे. खाद्यतेल उद्योगाकडून आगामी काळात आणखी कपातीची तयारी केली जात आहे.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं काय म्हटलं?
खाद्यतेलाच्या जागतिक किंमतीत सातत्यानं घसरण पाहायला मिळत आहे. खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीत आणखी कपात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महिनाभरात बोलावलेली ही दुसरी बैठक आहे. या बैठकीला सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनसह उद्योग प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. बैठकीत मंत्रालयानं सांगितलं, की आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती सतत घसरत आहेत आणि म्हणूनच खाद्यतेल उद्योगानं हे ठरवणं गरजेचं आहे की देशांतर्गत बाजारपेठेतल्या किंमतीही कमी ठेवण्यात याव्यात.
विविध कंपन्यांकडून प्रतिसादाची अपेक्षा
प्रथितयश खाद्य तेल संघटनांना त्यांच्या सदस्यांसोबत हा मुद्दा ताबडतोब उचलण्याची आणि खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत (MRP) प्रति लिटर 8-12 रुपयांनी तत्काळ प्रभावानं कमी करण्याची सूचना देण्यात आलीय.
जून 2022च्या मध्यापासून दर घटते...
वाढत्या अंतर्गत आणि लॉजिस्टिक खर्चासह इतर कारणांमुळे 2021-22 या कालावधीत खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत किंमती वाढल्या होत्या. जून 2022च्या मध्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत घट दिसून येतेय. त्यात पुढे म्हटलंय, की देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण हळूहळू दिसून येतेय. सर्वसामान्यांना मात्र अजूनही महाग खाद्यतेल विकत घ्यावं लागतंय. मागच्या महिन्यात काही कंपन्यांनी आपल्या खाद्यतेलाचे दर कमी केले होते. बदललेले दर त्वरीत आमलातही आणले होते. मात्र अद्याप अनेक कंपन्यांनी तेलाचे दर कमी केलेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयानं तशा सूचना दिल्यात.