Farming Idea: विदर्भातील अनेक शेतकरी आज पूर, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहे. त्यातच काही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करु पाहत आहे. उमरेड येथील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग यशस्वी केला. विदर्भात असलेल्या अत्यंत तफावतीच्या वातावरणात देखील या तरुणाने ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करुन यशस्वी केला आहे.
Table of contents [Show]
विदर्भातील वातावरण एक चॅलेंज
मुख्यत: दक्षिण अमेरिका, अॅमेझॉनचे खोरे, मॅक्सिकोचे जंगल, आदी ठिकाणी मिळणारे ड्रॅगन फ्रूट आता भारतात विपुल प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहे. भारतात हे पीक अंदमान निकोबार बेट, आंध्र प्रदेश, तमिळनाडु, ओडिशा, गुजरात या राज्यांमध्ये चांगले होते. दिवसाला दोन वेळेच्या वातावरणात प्रचंड तफावत असलेल्या विदर्भात ड्रॅगन फ्रूटची शेती करणे, हे एक चॅलेंज आहे. तरीसुध्दा प्रणय बारापात्रे नावाचा तरुण ही शेती यशस्वीपणे करीत आहे.
वर्षातून तीनदा केली जाते लागवड
सुरुवातीला 7 ते 8 लाख रुपयांची गुंतवणूक करुन प्रणयने कोरोना काळात शेती करण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी फारसे पीक आले नाही. मात्र, गेल्या वर्षी एका एकरामध्ये प्रणयने जवळपास 1000 किलोचे उत्पन्न घेतले. तेव्हा त्याने फळांच्या व्यापारीला 180 ते 200 किलो दराने आपला माल विकला. त्यावेळी त्याला 2 लाखाच्या जवळपास नफा झाला. तर या वर्षी दोनदा केलेल्या लागवडीत 900 किलोचे ड्रॅगन फ्रूटचे उत्पन्न प्रणय यांना मिळाले आहे आणि तिसऱ्या फेरीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षीचा 2 फेरीचा माल प्रणयने व्यापाऱ्याला 150 ते 160 रुपये किलो दराने दिला. पुढील तीन वर्षात ड्रैगन फ्रूटचे उत्पन्न दुप्पट-तिप्पट होईल आणि नफ्यात देखील वाढ होऊन वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचा नफा नक्कीच मिळेल, असा विश्वास युवा शेतकरी प्रणयने व्यक्त केला. यासोबतच तो सोयाबीन, हरभरा, तूर, हळद, मिर्ची, भाजीपाला यासारख्या पिकांचे देखील उत्पन्न घेतो. या माध्यमातून शेतीस लागलेला खर्च वजा करता, नफा मिळण्यास मदत होते.
सेंद्रिय खतांचा वापर
ड्रैगन फ्रूटची शेती करण्यासाठी प्रणयने संपूर्ण शेतामध्ये ठिंबक सिंचन बसविले आहे. महत्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण शेती प्रणय सेंद्रिय पद्धतीने करत आहेत. त्यामध्ये तो शेणखत, जीवामृत, कंपोस्ट खत, द्रव रुपातील सेंद्रिय खते, वार्मी खत, यासारख्या खतांचा वापर करतो. यामुळे पैशांची बचतही होते.
आरोग्यदायी सुपर फूड
ड्रॅगन फ्रूट हे आरोग्याकरीता अत्यंत लाभदायी असे फळ आहे. शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राखणे, शरीरातील पेशींची संख्या वाढविणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचं काम हे फळ करीत असते. त्यामुळे कोरोना काळापासून या फळाला प्रचंड मागणी वाढली आहे. या फळाला सुपर फूड असेही म्हणतात. मेट्रो सिटी आणि इतरही शहरांमध्ये काही नागरिक हे फळ दररोज खात असल्याची माहिती प्रणयने दिली.
मागणीनुसार वाढतात दर
कोरोना पासून अचानक मागणी वाढल्याने ड्रैगन फ्रूट 100 रुपयाला एक मिळत असे. मात्र, जून-जुलै महिन्यात गूजरात येथे चक्रीवादळ आल्याने माल खराब होऊ नये म्हणून अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी माल विक्रीस काढला होता. त्यामुळे त्या काळात 100 रुपयाला 4 याप्रमाणे ड्र्रॅगन फ्रूटची विक्री किरकोळ बाजारात होत होती. आता परत ठोक बाजारात या फळाचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. शिवाय गेल्या दोन-तीन महिन्यापासून विदर्भात डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने परत या फळाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आता किरकोळ बाजारात हे फळ 80 ते 120 रुपयाला एक असे मिळत आहे. फळाची गुणवत्ता बघून या फळाचे दर ठरत असते.
नफा देणारी शेती
ड्रॅगन फ्रूटची शेती ही तीन ते चार वर्षातच उत्तम नफा मिळवून देणारी आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्याला संयम ठेवावा लागतो. शेतीची योग्य पद्धतीने देखभाल करुन वेळ द्यावा लागतो. हीच शेती सेंद्रीय पद्धतीने केल्यास फळाची गुणवत्ता अधिक चांगली येते. तसेच दुकानामधून खते विकत आणण्यास लागणारा खर्चही वाचतो. योग्य पद्धतीने देखभाल करीत जर ही शेती केली आणि एकदा जर या पिकांचे मुळ जमिनीत रुजले, तर ही शेती तुम्हाला नफा देणारी आहे, अशी माहिती युवा शेतकरी प्रणय बारापात्रे यांनी दिली.