हल्ली भाजीपाल्यापासून फ्रीज, कपाटापर्यंत सर्व गोष्टी आपण ऑनलाईन ऑर्डर करुन घरी मागवू शकतो. अशाच प्रकारे आता बहुतांश सरकारी बँका आणि काही खासगी बँका त्यांच्या खातेदारांना घरबसल्या बँकिंग सेवा देत आहेत. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्ही सरकारी बँकांनी डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिससाठी टोल फ्री नंबर जारी केला आहे. (1800-1037-188,1800-1213-721) या नंबरवर फोन करुन आपण त्यांच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. याला डोअरस्टेप बँकिंग (Doorstep Banking)असे म्हटले जाते. या सेवेमुळे बँकेत जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून मुक्तता झाली.
- या सुविधेमुळे घरबसल्या लोकांना पैसे काढण्यासह अन्य बँकिंग सुविधांचा लाभ मिळणे शक्य झाले आहे.
- बँकेचे ग्राहक अत्यंत किरकोळ शुल्क देऊन या सेवेचा अनुभव घेऊ शकतात.
- एखाद्याला बँकेतून काही रक्कम काढायची असेल तर तो डीएसपी अॅप किंवा वेब पोर्टलला भेट देऊन किंवा टोल फ्रि नंबरवर कॉल करुन ही सुविधा घेऊ शकतो.
- बँक खाते आधारला लिंक असल्यास बँकेच्या डेबिट कार्डच्या मदतीने आपण एक हजार ते दहा हजार रुपये काढू शकतो. एचडीएफसी बँक आणि एसबीआय यांच्या मोबाईल एटीएममधून 20 हजार रुपये काढता येतात.
- या सेवेसाठी अर्ज केल्यानंतर सदर बँकेचा प्रतिनिधी आपल्या घरी एक मायक्रो एटीएम मशिनसह येईल.
- याबरोबरच ग्राहकांना अन्य दहा बिगर वित्तीय सेवा देखील उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. यात चेक स्वीकारणे, नवीन चेकसाठी विनंती करणे, खात्याचे विवरणपत्र (Statement) मिळवणे, 15 G किंवा 15 H फॉर्म घेणे आणि देणे, KYC कागदपत्रे जमा करणे, डिमांड ड्राफ्टसाठी विनंती करणे, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देखील घरपोच सुविधेतंर्गत जमा करता येणार आहे.
- या सुविधेचा लाभ घेण्यासाठी साधारण 60 ते 200 रुपये शुल्क आणि त्यावर GST ही आकारला जातो.
- आपल्याला हवी असणार्या सेवेची विनंती ही दुपारी तीन वाजेपर्यंतच मान्य झाली तर त्याच दिवशी आपल्याला घरपोच सेवा मिळू शकते. त्यानंतर विनंती आल्यास दुसर्या दिवशी एजंट आपल्या घरी येईल.
आपल्याला स्वत: मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकाच्या माध्यमातून मोबाईल ओटीपीच्या मदतीने डोअरस्टेप बँकिंग अॅपमध्ये नोंदणी करावी लागेल. त्यापूर्वी डोअरस्टेप बँकिंग अॅपमध्ये लॉगइन करावे लागेल. त्यानंतर बँकेची निवड मग खाते क्रमांक आणि पिन द्यावा लागेल. त्याची पडताळणी केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. आता आपल्याला अॅपवर बँकेचे नाव, अकाउंट नंबर, शाखेचे नाव आदी लिहावे लागेल. त्या ठिकाणी पैसे काढण्याचा पर्याय दिसू लागेल आणि पिक अप आणि ड्रॉपसाठी सध्याचा पत्ता द्यावा लागेल. पत्त्याचा उल्लेख केल्यानंतर दहा किलोमीटरच्या परिघातील बँकेच्या शाखा दिसतील. त्यापैकी बँकेच्या शाखेची निवड करावी लागेल आणि कॅश डिलिव्हरीसाठी टाइम स्लॉटची निवड करावी लागेल. आपल्या कोणत्या वेळेला सुविधा हवी आहे, त्याची निवड करा. या प्रक्रियेनंतर आपल्याला संदेश येईल. या संदेशात आपल्या घरी येणार्या बँक कर्मचार्यांचे नाव, नंबर आदींची माहिती मिळेल.