भारतीय रेल्वे (Indian Railway) ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये तिची पोहोच आपल्याला पाहायला मिळते. आपण बऱ्याच वेळा रेल्वेने प्रवास करतो, त्यामुळे आपल्याला रेल्वेचे अनेक नियम माहित असतात. पण आज आम्ही तुम्हाला रेल्वेचे असे 4 नियम सांगणार आहोत, ज्याचे उल्लंघन प्रवाशांनी केले, तर त्यांना दंड तर भरावा लागेल सोबतच तुरुंगातही जावे लागू शकते. कोणते आहेत ते नियम, चला जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
ट्रेनच्या छतावरून प्रवास करणे
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या व्यक्तीला रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना पकडले, तर त्या व्यक्तीला रेल्वे कायद्याच्या कलम 156 अंतर्गत 3 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 500 रुपयांचा दंड किंवा दोन्ही गोष्टी एकावेळी ठोठावल्या जाऊ शकतात.
रेल्वे तिकिटांचा गैरवापर करणे
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार कोणतीही व्यक्ती रेल्वेच्या तिकिटासंदर्भात गैरव्यवहार जसे की, अनधिकृतपणे विक्री करू शकत नाही. जर एखादी व्यक्ती असे करताना पकडली गेली, तर रेल्वे कायद्याच्या कलम 143 अंतर्गत त्या व्यक्तीला 10 हजार रुपये किंवा 3 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
रेल्वे आवारात वस्तूंच्या विक्रीवर बंदी
रेल्वेच्या परवानगी शिवाय देशातील कोणत्याही रेल्वे कॉम्प्लेक्समध्ये कोणत्याही वस्तूची विक्री करता येत नाही, किंवा फेरीने सामानही विकता येत नाही. तसा कोणी प्रयत्न केला तर, त्या व्यक्तीला रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत 2 हजार रुपये दंड किंवा 1 वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
उच्च श्रेणीच्या डब्यातून प्रवास
प्रवाशाकडे असलेल्या तिकिटावर तो कोणत्या डब्यातून प्रवास करेल, हे नोंदवण्यात आलेले असते. तिकिटावर नोंदवलेली श्रेणी सोडून जर का प्रवाशाने उच्च श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला आणि तो व्यक्ती सापडला, तर रेल्वेच्या नियमानुसार कलम 138 अंतर्गत त्या व्यक्तीकडून अधिक अंतराचे पैसे घेतले जातात. याशिवाय 250 रुपये दंड म्हणून आकाराला जातो. जर प्रवाशाने हा दंड दिला नाही, तर त्याला ताब्यात घेतले जाते.