गेल्या काही वर्षांत महागाई प्रचंड वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले. या सगळ्यामुळे अनेकांचे महिन्याचे बजेट कोलमडते आणि त्यात जर घरात कोणी आजारी पडलं तर पैसा पाण्यासारखा कसा खर्च होतो हे कळत नाही. एखाद्या साध्या रुग्णालयाचे बिल ही लाखो रूपयांमध्ये जाते. त्यात चांगले रुग्णालय असेल तर तुमचे बिल किती होईल याचा अंदाज लावणे ही कठीण जाते. म्हणून वैयक्तिक स्वत:चा आणि घरातील मंडळींचा आरोग्य विमा (Health Insurance) उतरवणे गरजेचे आहे. पण हा आरोग्य विमा काढताना तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्याचा मिळणाऱ्या क्लेमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विमा घेताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे आपण समजून घेणार आहोत.
आरोग्य विमा घेताना काढताना साधारणत: आरोग्य विम्याचे प्रकार किती आहेत? तुम्ही किती हफ्ता भरला की तुम्हाला कितीपर्यंतचा क्लेम मिळेल? त्यात कोणकोणत्या आजारांपासून तुम्हाला संरक्षण मिळेल? याविषयीची माहिती विमा एजंट देतो. त्यानंतर तुम्हाला योग्य वाटणारा आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला परवडणाऱ्या पॉलिसीची तुम्ही निवड करता. पण पॉलिसी विमा कंपनीपासून कोणतीही माहिती लपवू नये. विशेषत: जुने आजार, वंशपरंपरेने चालत आलेले आजार याची माहिती विमा कंपनीला देणे गरजेचे आहे. कारण कंपनी तुमच्या आरोग्यविषयीच्या माहितीनुसारच तुमच्यासाठी विमा पॉलिसी निश्चित करते. तुम्हाला होऊ शकणारे संभाव्य आजार, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यासाठी आकारला जाणारा हप्ता इत्यादी गोष्टींचा यात समावेश असतो.
आरोग्य विम्याचा दावा
आरोग्य विम्याचा दावा कॅशलेस (cashless) किंवा रिएम्बर्समेंट (reimbursement) अशा दोन पद्धतीने करता येतो. कॅशलेस पद्धतीत तुम्ही रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तुमचे रुग्णालयाचे अधिकाधिक बिल विमा कंपनी भरते. रिएम्बर्समेंट पद्धतीत तुम्ही रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरता आणि त्यानंतर तुम्हाला रुग्णालयाने दिलेली डिस्चार्ज समरी, तपासण्यांचे अहवाल, औषधांची बिले आणि रुग्णालयाचे अंतिम बिल या आधारे विमा कंपनीकडे दावा करावा लागतो. अशा पद्धतीने दावा केल्यानंतर विमा कंपनी तुमच्याकडे आणखी काही कागदपत्रे मागू शकते. तसेच कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर कंपनी तुमचा दावा अस्वीकृत करण्याची कारणे ही देऊ शकते. विमा कंपन्यांचे काही रुग्णालयांसोबत टायअप असते. अशावेळी त्या रुग्णालयात तुम्ही कोणतेही पैसे न भरता उपचार घेऊ शकता. त्याउलट विमा कंपन्यांचे ज्या रुग्णालयांसोबत टाय अप नसते त्यांना नॉन नेटवर्क हॉस्पिटल असे म्हटले जाते. या रुग्णालयांमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णाला उपचार कॅशलेस करता येत नाहीत. रुग्णालयाचे बिल आधी रुग्णालयाला भरावे लागते आणि त्यानंतर रिएम्बर्समेंट पद्धतीद्वारे दावा करावा लागतो.
आरोग्य विम्याचे नुतनीकरण
आरोग्य विमा घेतला की सगळे टेन्शन दूर, असे सगळ्यांना वाटते. पण विमा घेतल्यानंतरही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा नूतनीकरण. आरोग्य विम्याचे दरवर्षी नुतनीकरण करणे गरजेचे असते. तुम्हाला शक्य असेल तर नूतनीकरण करताना विमा संरक्षणाची रक्कम वाढवून घ्यावी. वयानुसार कधीही विमा संरक्षणाची रक्कम जास्त असलेली चांगली असते. कारण तुमचे वय ज्याप्रकारे वाढते, त्यानुसार अनेक आजार बळावण्याची शक्यता असते.
गेल्या वर्षभरात तुम्हाला कोणते आजार झाले असल्यास त्याबद्दल विम्याचे नुतनीकरण करताना माहिती देणे गरजेचे आहे. वर्षभरात तुम्हाला काही आजार झाला असेल आणि त्यासाठी तुम्ही विमा कंपनीकडे दावा केला नसेल, तरीही त्याची माहिती विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. धोरण किंवा नियामक निकषातील काही बदलांमुळे विम्यांच्या अटीत आणि नियमांत वेळोवेळी बदल होत राहतो. त्यामुळे पॉलिसीचे नूतनीकरण करताना विमा रक्कम, दावे आणि त्याची संख्या, नो क्लेम बोनस आदींची माहिती घ्यावी.
आरोग्य विम्याचे नुतनीकरण करताना सध्याची विमा योजना पुरेशी वाटत नसेल तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना ‘टॉप अप’ (Top Up) या पर्यायाचा निवड करू शकता. विम्याचे नुतनीकरण करण्यास उशीर झाल्यास तुम्हाला पुन्हा नव्याने पॉलिसी घ्यावी लागते. याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे विमा कंपनीकडून नवीन ग्राहक म्हणून तुमची गणना होते. त्यामुळे न चुकता आरोग्य विम्याचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. अनेक आरोग्य विम्याच्या पॉलिसीत ठराविक आजारांवर किंवा जुन्या आजारांवर प्रतीक्षा कालावधी लागू केला जातो. तुम्ही पॉलिसीचे नुतनीकरण करायला विसरल्यास नवीन पॉलिसीप्रमाणेच तुम्हाला प्रतीक्षा कालावधी लागू होतो.
आरोग्य विमा हा कधीही वर्षभराचा असतो. तुम्ही वर्षभरात कोणताही दावा दाखल न केल्यास तुम्हाला कंपनीकडून नो क्लेम बोनस मिळतो. या संदर्भात प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे नियम आहेत. काही कंपन्या तुमचा पुढील वर्षाचा हफ्ता कमी करतात तर काही तुमच्या विम्याची रक्कम वाढवून देतात. त्यामुळे नुतनीकरण करताना याविषयी माहिती घेणे गरजेचे असते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            