सामान्य विमा पॉलिसी (General Insurance Policy) ही विमा उतरवलेल्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा तोटा झाल्यास आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत करते. ज्याप्रमाणे जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत मदत करते. भारतात, अनेक प्रकारच्या सामान्य विमा पॉलिसी आहेत ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
जर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी, मालमत्तेसाठी किंवा नियोजित प्रवासातील जोखीमा टाळायच्या असतील किंवा त्या चांगल्या प्रकारे मॅनेज करायच्या असतील तर प्रत्येक प्रकारच्या सामान्य विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण अशाच काही सामान्य विमा पॉलिसींबद्दल जाणून घेणार आहेत.
आरोग्य विमा म्हणजे काय?
आरोग्य विमा पॉलिसीमध्ये मेडिकल इमर्जन्सीदरम्यान झालेल्या उपचारांचा खर्च भरपाई म्हणून परत मिळवण्याची सोय असते. यात हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून तिथला औषधांचा, आरोग्य तपासणी अहवालांचा आणि डॉक्टरांच्या व्हिजिटचा असा सर्व खर्च समाविष्ट असतो.
साधारणपणे दोन मूलभूत प्रकारच्या आरोग्य विमा योजना असतात.
मेडिक्लेम प्लॅन (Mediclaim Plan) : या प्लॅनमध्ये हॉस्पिटलमध्ये अडमिट झाल्यापासून सर्व खर्चाचा समावेश होतो. पॉलिसीधारकाने हॉस्पिटलमधील खर्चाची बिले, तपासणी अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर एका मर्यादेच्या अधीन राहून खर्च झालेली रक्कम विमा कंपनीकडून परतफेड केली जाते.
गंभीर आजार योजना (Critical Illness Plan) : यामध्ये विशिष्ट गंभीर आजारांचा समावेश असतो. ग्राहकाने पॉलिसी निवडताना ज्या कव्हरची निवड केलेली असते त्याआधारे विमा कंपनीकडून परतफेड होते. अशा प्रकारच्या पॉलिसीमध्ये खर्चानुसार नाही तर निवड केलेल्या कव्हर आधारे परतफेड दिली जाते.
Motor Insurance मोटर विमा म्हणजे काय?
मोटार विमा पॉलिसीमध्ये, अपघात झाल्यावर किंवा तुमच्या गाडीमुळे तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या मालमत्तेला काही इजा-नुकसान झाल्यास त्या व्यक्तीने मागितलेल्या नुकसान भरपाईची परतफेड यामधून करता येते. यात तुमच्या स्वत:च्या गाडीचा अपघात, गाडीची झीज, चोरीसह गाडीचे सर्व प्रकारचे नुकसान कव्हर असते. कायद्यातील नवीन तरतुदीनुसार भारतात आता, थर्ड-पार्टी मोटर विमा खरेदी करणे अनिवार्य आहे.
तुमची गाडी चोरीला गेल्यास किंवा गॅरेजमधील दुरुस्तीच्या खर्चापासून नेहमीच्या वाहतूक खर्चापर्यंत सर्व काही कव्हर करणाऱ्या मोटार विमा पॉलिसींचे अनेक प्रकार असले तरी, कव्हरेजच्या मर्यादेवर आधारित थर्ड पार्टी लायब्लिटी इन्श्युरन्स (Third-party liability insurance) आणि कॉम्प्रेहन्सिव मोटर इन्स्शुरन्स (Comprehensive motor insurance) या दोन मुख्य प्रकारांमध्ये सर्व गोष्टी समाविष्ट आहेत.
Travel Insurance प्रवास विमा म्हणजे काय?
प्रवासादरम्यान अचानक संकटे येतात; ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीद्वारे भरून काढता येऊ शकते. प्रवास विमा पॉलिसी व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी किंवा फिरण्यासाठी परदेशात किंवा देशांतर्गत अशा दोन्ही प्रवासांना कव्हर करतात.
प्रवासादरम्यान उद्भवू शकणारी संकटे म्हणजे, सामान हरवणे, विमान उड्डानाची वेळ उशिराने होणे, परदेशात अचानक वैद्यकीय आणीबाणी येणे किंवा काही वेळेस संपूर्ण ट्रिप रद्द करावी लागते, यामुळे तुमचे नियोजन तर फसते पण त्याचबरोबर आर्थिक नुकसान ही होते. ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीमधून हा खर्च भरून काढण्यास मदत होऊ शकते.
Home Insurance गृह विमा म्हणजे काय?
होम इन्शुरन्स पॉलिसी ही तुमच्या घराचे नुकसान झाल्यास होणारे आर्थिक नुकसान कव्हर करते. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई गृह विमा पॉलिसी करते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे तुमच्या घराचे नुकसान झाल्यास एक चांगली होम इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला कव्हर करू शकते. या पॉलिसीमध्ये तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू देखील कव्हर होऊ शकतात. फक्त यात तुमचे नुकसान कितीही असो, विमा कंपनी पॉलिसीमध्ये नमदू केलेल्या रकमेपेक्षा अधिक रकक्म देऊ शकत नाही.
Commercial Insurance व्यावसायिक विमा म्हणजे काय?
व्यावसायिक विमा पॉलिसी या वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमींना कव्हर करतात. त्यानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. जसे की, मालमत्तेचा विमा, अग्नि विमा, सागरी विमा, व्यावसायिक सामान्य दायित्व विमा, कामगारांच्या नुकसान भरपाईचा विमा. व्यावसायिक व्यवहार करणाऱ्याला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. ते भरून काढण्यासाठी व्यावसायिक विमा पॉलिसीचा चांगला उपयोग होऊ शकतो.
General Insurance विमा पॉलिसीमुळे तुमचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. वरीलपैकी कोणतीही विमा पॉलिसी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करू शकता. यासाठी थेट विमा कंपनी किंवा विमा एजंटची मदत घेऊ शकता. कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करताना त्यातून तुमच्या गरजा पूर्ण होतात की नाही आणि त्यासाठी भरावा लागणारा प्रीमियम याची खातरजमा करणे आवश्यक आहे.