शेअर मार्केटमधील प्रत्येक शेअर्सवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. न्यूज चॅनेलवरील बातम्या, चालू घडामोडी, राजकीय घडामोडी, सरकारचे निर्णय, कंपन्या-सेक्टरमधील बातम्या इत्यादींचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसतो. या सर्व नियमित गोष्टींसोबतच अर्थव्यवस्थेचाही परिणाम शेअर मार्केटवर आणि थेट कंपन्यांच्या शेअर्सवर होत असतो.
शेअर मार्केटवर अर्थव्यवस्थेमुळे होणारे परिणाम व इतर गोष्टींमुळे होणारे परिणाम यात फरक आहे. इतर घडामोडींमुळे मार्केटमध्ये त्याचे परिणाम लगेच दिसून येतात खरे, पण त्या परिणामांचा काळ हा मर्यादित असतो. पण अर्थव्यवस्थेमुळे होणारे परिणाम हे वेगळे असतात. त्याचा परिणाम दीर्घकालीन असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याबद्दल अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात अर्थव्यवस्थेचे शेअर मार्केटवर होणारे परिणाम काय असतात.
महागाई आणि डिफ्लेशन (Inflation & Deflation)
चलनवाढीचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. महागाई हा यातला महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा महागाई दर कमी असतो, तेव्हा शेअर मार्केटमध्ये विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो. पण जेव्हा महागाई दर वाढतो, तेव्हा मार्केटमध्ये घसरण सुरू होते. कारण वाढत्या महागाईच्या दरात गुंतवणूकदारांना असे वाटते की, कंपन्यांनी खर्चामध्ये कपात केली तर महसुलात घट होऊ शकते. आणि त्याचा थेट परिणाम वस्तुंच्या किमती वाढण्यावर होऊ शकतो. डिफ्लेशन हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. जेव्हा मार्केटमध्ये वस्तूंची किंमत कमी होते. तेव्हा गुंतवणूकदार याकडे वेगळ्या अर्थाने पाहतात. जसे की, या स्थितीकडे ते कमकुवत अर्थव्यवस्था म्हणून पाहतात. परिणामी मार्केटमध्ये पुन्हा घसरण व्हायला लागते.
व्याज दार (Interest Rates)
सरकारी आणि खाजगी बँकांच्या व्याजदराचा शेअर मार्केटवर परिणाम होऊ शकतो. व्याजदर अधिक म्हणजे कर्ज घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार. ही खर्च आटोक्यत आणण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी कंपन्या खर्चात कपात करण्याचा मार्ग स्वीकारतात. यामुळे कामगारांना कामावरून कमी केले जाते. काहीवेळेस उत्पादन थांबवले जाते. त्यामुळे आरबीआयकडून जाहीर होणाऱ्या रेपो दरांचा (Repo Rate) किंवा व्याज दराचा (Interest Rate) शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा रेपो रेट वाढला की, मार्केटमधील बॅंकांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येते.
परदेशी बाजार (Foreign Markets)
जागतिक पातळीवरील किंवा इतर महत्त्वाच्या देशातील बाजारांमधील ट्रेंडचा भारतीय शेअर मार्केटवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा परदेशातील अर्थव्यवस्था मंदावलेली असते. तेव्हा भारतीय कंपन्यांची निर्यात कमी होते. परिणाम त्या कंपन्यांच्या महसुलात घट होते. तीच घट शेअर मार्केटमध्येही दिसून येते. जर जागतिक पातळीवर डॉलरचा दर वाढला तर त्याचा लगेच परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होतो. अशावेळी मार्केटमधील गुंतवणूकदारांकडून रिप्पल इफेक्ट पाहायला मिळतो. रिप्प्ल इफेक्ट म्हणजे एका व्यक्तीने केलेल्या कृतीचा इतरांच्या कृतीवर परिणाम होणे. या साऱ्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर दिसून येतो.
शेअर मार्केट हे यासाठीच खूप सेन्सेटीव्ह मानले जाते. कारण कोणत्याही घटनेमुळे किंवा एखाद्या बातमीमुळे शेअर मार्केटमध्ये पडझड किंवा तेजी येते. एखाद्या साध्या घटनेमुळे होणारे परिणाम अल्प असतात. पण अर्थव्यवस्थेतील निर्णयामुळे किंवा अर्थव्यवस्थेतील चढ-उतारामुळे शेअर मार्केटवर होणारे परिणाम दीर्घकालीन राहू शकतात.