घर हा सर्वाच्याच जिव्हाळ्याचा भाग असतो. जर तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि गुंतवणुकीचा विचार करीत असाल तर सर्वात आधी विचार येतो तो प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा. एक घर असतानाही अनेक गुंतवणूकदार घरामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. पण ही गुंतवणूक करणे योग्य आहे का. तसेच गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे ते पाहूया.
गुंतवणूक म्हणून दुसरे घर हे निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी किंवा नियमित उत्पन्नासाठी फारसे उपयोगी पडत नाही. परताव्याचा हिशेब करताना तो घराच्या खरेदी किंमतीवर न करता, त्याच्या चालू बाजारमूल्यावर करायला पाहिजे. घरभाडे मिळते पण त्यातून घराची दुरुस्ती, सोसायटीचे शुल्क, नगरपालिकेचे कर (Municipal Taxes) आणि घरभाड्यावरचा प्राप्तिकर असे खर्च जाऊन फक्त 2 ते 3 टक्के एवढाच परतावा हाती लागतो. त्यामुळे घर घेण्यापेक्षा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार केल्यास अधिक परतावा किंवा फायदा होऊ शकतो.
दुसरे घर घेण्यापूर्वी या बाबींचा विचार करा
- दुसरे घर कर्ज काढून घेऊ नका. कारण व्याजावर अधिक रक्कम खर्ची होते.
- योग्य घर शोधणे, करारनामा करणे, कर्ज काढणे, हप्ते देणे असे अनेक व्याप असतात.
- जर बांधकाम सुरु असेल तर पूर्णत्त्वाचा दाखला मिळणे, हस्तांतर होण्यात किती वेळ लागू शकेल हे सांगता येत नाही.
- भाडेकरु मुदतीनंतर जागा सोडेल आणि नीट वापरेल असे भाडेकरू शोधणे, करार करून त्याची नोंदणी करणे, तसेच भाडेवसुली करावी लागते.
- घर रिकामे राहिल्यास, भाडे न मिळाल्याने ही नुकसान होते.
- घर बंद असेल किंवा भाड्याने दिले असेल तरी घराची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि देखभाल करावी लागते.
- घरातून अधिक मोबदला हवा असेल तर ते विकूनच फायदा होऊ शकतो. तसेच विकायच्या वेळेला भाव चांगला मिळेल याची खात्री देता येत नाही.
- कर्जावरील व्याजाचा हिशेब लक्षात घेतला तर फायदा अजून कमी होतो.
- केवळ प्राप्तिकर सवलत मिळते म्हणून घर घेणे फायदेशीर नाही.
इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार करा
फक्त गुंतवणूक म्हणून घर घेत असाल तर ते फायदेशीर ठरत नाही. वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार केल्यास याच पैशातून जास्त परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडातील (इक्विटी/हायब्रिड) गुंतवणुकीचा विचार केला, तर जोखीम-परतावा या निकषावर ती अधिक चांगली आहे. त्यातून जास्त नियमित उत्पन्न मिळू शकते, जोखीम कमी असते आणि अंशत: विक्रीही करता येते. त्यात पारदर्शकता असल्याने लक्ष ठेवणे आणि विक्री करणे सोपे आहे. पैसे वेळेवर आणि नक्की मिळण्याची खात्री असते. यामुळे दुसरे घर किंवा जमीन यात गुंतवल्याने तेवढा फायदा मिळणार नाही.
गुंतवणूक करणे भविष्यासाठी गरजेची आहे. अशा वेळी आपल्याला कमी जोखमीची पण खात्रीशीर अधिक परतावा मिळेल अशा पर्यायांचा विचार गुंतवणूक करावी.