टाटा स्टीलचं मुख्य कार्यकारी कार्यालय (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) टी. व्ही. नरेंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2030पर्यंत 40 दशलक्ष टन क्षमता गाठण्याची संधी भारतातल्या प्लांटमध्ये आहे. यानिमित्तानं उत्पादन क्षमता वाढवण्यावर कंपनी भर देणार आहे. टाटा स्टील यूके सरकारशी तिच्या कामकाजासाठी आर्थिक पॅकेजवर वाटाघाटी करत राहणार आहे. टाटा स्टीलनं भारतातल्या कामकाजासाठी 12,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना आखलीय, अशी माहिती त्यांनी दिली.
उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना
नरेंद्रन म्हणाले, की भारतात उत्पादन क्षमता वाढवण्याची आमची योजना आहे. आमच्याकडे आधीच सुमारे 21 दशलक्ष टन क्षमता आहे. कलिंगनगरचा विस्तार होत असल्याने ते लवकरच 25 दशलक्ष टन होईल. आमच्याकडे आणखी काही योजना आहेत. निलाचल, कलिंगनगर आणि मेरामंडली किंवा अंगुल यांना एकत्र करून 2030पर्यंत 40 दशलक्ष टन क्षमता गाठली जाऊ शकते, असं ते म्हणाले.
अनेक प्रकल्प सुरू
भारतात विविध ठिकाणी अनेक प्रकल्प सुरू आहेत आणि कंपनीनं वार्षिक 5 दशलक्ष टन कलिंगनगर विस्तार पूर्ण करण्यास प्राधान्य दिलंय. कंपनी ओडिशातल्या कलिंगनगर इथल्या आपल्या प्लांटची क्षमता 3 दशलक्ष टनांवरून 8 दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. अधिग्रहणानंतर 9 महिन्यांत आम्ही नीलाचल इस्पात निगम लिमिटेडची क्षमता वार्षिक आधारावर 10 लाख टनांपर्यंत वाढवलीय. क्षमता विस्ताराबाबत नरेंद्रन म्हणाले, की भारतात 12,000 कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला जाईल. पुढचे किमान 3 वर्षे ते याच पातळीवर राहील.
नुकताच केला होता विक्रम
टाटा स्टीलनं आगामी काळात आपला विस्तार करण्याचं नियोजन केलं असलं तरी पोलाद उद्योगात कंपनीनं भरारी घेतली. मागच्या महिन्यात कंपनीतलं सर्वोच्च उत्पादन करण्याचा विक्रम झाला होता. 19.9 दशलक्ष टन इतकं विक्रमी उत्पादन झालं होतं. कंपनीचं मार्केटिंग जाळं त्याचप्रमाणं उत्तम व्यवसाय मॉडेल यामुळे देशांतर्गत उत्पादनात हा विक्रम गाठण्यात कंपनीला यश आलं. टाटा टिस्कॉन, टाटा कोश, टाटा अॅस्ट्रम आणि टाटा स्टीलियम यांनी ब्रँडेड उत्पादनं आणि किरकोळ विभागातल्या डिस्ट्रीब्यूशनमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली. नीलाचल इस्पातचं अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर मागच्या दोन तिमाहींमध्ये इथली कामगिरी नेहमीच वरच्या स्तरावर राहिलीय.
शेअरचा उच्चांक
खरं तर 2022 हे वर्ष शेअर बाजाराच्या दृष्टीनं सुस्त गेलं असंच म्हणावं लागेल. मात्र त्यातही टाटा स्टीलच्या शेअरमध्ये चांगली हालचाल पाहायला मिळाली. मध्यंतरी टाटा स्टीलचा शेअर उच्चांकी 117 रुपयांवर पोहोचला होता. जानेवारीमधली ही स्थिती होती. त्याआधी जुलै 2022मध्ये टाटा स्टीलचं विभाजन झालं होतं. त्या विभाजनानंतरचा हा उच्चांकच म्हणावा लागेल. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये वाढच अनुभवायला मिळतेय. तर देशाच्या स्टील उत्पादनात टाटा स्टीलचा वाटा 33 टक्क्यांच्या वर गेल्याचं दिसून आलं. टाटा स्टीलचा 5mtpa ब्राउनफिल्ड प्रकल्पाचा सध्याचा विस्तार 8mtpaपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कंपनीचा विस्तारदेखील होईल.
भारतातल्या स्टील उत्पादक कंपन्यांचं भवितव्य सध्यातरी चांगलं दिसतंय. त्यातही टाटा स्टील सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. उत्पादन वाढवलं जात आहे. टाटा स्टील तर विविध पद्धतीनं आपला व्यवसाय विस्तार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात यशही येताना दिसून येतंय.