प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविषयासाठी आयुष्यभर झटत असतात. मुलांना खूप कष्ट पडू नयेत म्हणून ते कामात स्वतःला झोकून देतात. भारतासह जगात सगळीकडे वडील आपली जबाबदारी पार पाडत जगाला सामोरं जाण्यासाठी मुलांना स्वतःच्या पायावर उभं करतात. काही देशात मूल 18 वर्षांचं झाल्यावर त्याला स्वतःची जबाबदारी घ्यावी लागते. पण भारतात मूल कितीही मोठे झाले तरी वडिलांच्या सोबत राहून त्यांच्या विचाराने आर्थिक निर्णय घेतं. वडिलांनी अनेक पावसाळे बघितले असल्याने मुलांनाही त्यांचे मत महत्त्वाचे वाटत असते.
मुलं वडिलांकडून काय शिकतात
मुलं आपल्या पालकांकडे बघून अनेक गोष्टी शिकत असतात. यामुळे वडिलांच्या पैसे वाचविण्याच्या सवयीने मुलांनाही बचतीची सवय लागते. ही सवय लावताना वडील मुलांना छोट्याछोट्या गोष्टीतून बचत कशी करायची हे कायम सांगत असतात. अनेक वेळा मुलं मागतील ते त्यांच्या हातात दिल्यास मुलांना त्या वस्तूची किंवा त्या गोष्टीची किंमत राहत नाही. अशावेळी मुलांनी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केल्यास ती वस्तू कशी उपयोगी नाही किंवा महाग आहे, हे वडील पटवून देतात. तसेच या पैशात दुसरी कोणती गरजेची वस्तू येऊ शकते हे समजावून सांगतात. यातून मुलांना कुठे खर्च करायचा याचा अंदाज येतो. मूल जसजसं वाढत जातं तसं वडिलांच्या बचतीच्या टिप्स वाढत जातात.
बचतीचा पहिला धडा
कोणत्याही मुलाला बचतीसाठी सुरूवातीला पिगी बँक दिली जाते. घरात कोणी नातेवाईक आले की हमखास मुलांना खाऊसाठी पैसे दिले जातात. हे पैसे चॉकलेट गोळ्यांमध्ये खर्ची पडू नये म्हणून हे पैसे पिगी बँकमध्ये टाकण्याचा सल्ला दिला जातो. हा मुलांसाठी बचतीचा पहिला धडा असतो. असे केल्याने मुलांना बचतीची सवय लागते.
खर्च कसा करायचा
मुलं महाविद्यालयात जाऊ लागल्यावर वडिलांकडून आपल्या मुलांना खर्चासाठी ठराविक पैसे दिले जातात. तसेच पैसे कुठे खर्च करतात याची नोंद ठेवायला सांगतात. याने मुलांना आपण पैसे किती आणि कुठे खर्च केले याची नोंद केल्याने खर्चाचा अंदाज येतो. हे मुलांना भविष्यासाठी फार उपयोगी पडते. तसेच पालकांना मुले पैसे कुठे खर्च करतात याचाही अंदाज येतो. जर हा खर्च विनाकारण केलेला असेल तर मुलांना कोणता खर्च गरजेचा आणि कोणता खर्च वायफळ आहे, यातील फरक समजावून सांगता येतो.
पहिल्या पगाराच्या पैशाचे नियोजन
भारतातील बरीच मुलं पहिली नोकरी लागल्यानंतर त्यांचा पहिला पगार वडिलांच्या समोर ठेवतात. तसेच अनेक मुलांचे पहिले बँक अकाउंट हे वडिलांसोबत जॉईंट अकाउंट असते. अशावेळी वडील आपल्या मुलांना पैसे कसे गुंतवायचे याचे मार्गदर्शन करतात. या मार्गर्शनात पहिला सल्ला छोट्या गुंतवणुकीचा दिला जातो. त्यानंतर गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती आणि फायदे सांगितले जातात.
भारतातील कुटुंबव्यवस्थेत वडील हे केंद्रस्थानी असतात. अनेक उदाहरणात आपण बघतो मुलांना आई जवळची वाटते पण त्याच वेळी कोणत्याही आर्थिक निर्णयात वडिलांचे मत अधिक विचारात घेतले जाते.