रेल्वे हे प्रवासाचं सर्वात स्वस्त आणि सुरक्षित साधन मानलं जातं. लोक त्यांच्या सोयीनुसार या डब्यांमध्ये तिकीट बुक करून सहज प्रवास करू शकतात. या डब्यांचेही अनेक प्रकार आहेत. म्हणजेच एका रेल्वेला विविध सुविधा असणारे डबे असतात. त्यात जनरल (General), स्लीपर (Sleeper), कार चेअर (Car chair) तसंच एसी (AC)... आता एसी ट्रेन आपल्याला काही विशेष वाटत नसल्या तरी याची सुरुवात रंजक आहे. सध्या भारतीय रेल्वे देशातल्या प्रत्येक मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हाय स्पीडनं चालवण्याचा विचार करत आहे. ही आठ डब्यांची ट्रेन असून एसी सुविधा यात आहे.
ब्रिटीश काळात सुरू
पहिली एसी ट्रेन ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली. 1934 साली फाळणीपूर्वी पहिली एसी ट्रेन ऑपरेट करण्यात आली होती. त्यावेळेस गाड्यांची फर्स्ट आणि सेकंड क्लास अशी विभागणी करण्यात आली होती. फर्स्ट क्लासमध्ये फक्त इंग्रजांना प्रवास करण्याची परवानगी होती. या उद्देशानं हा डबा थंड ठेवण्यासाठी एसी बोगीमध्ये तो रूपांतरित करण्यात आला. ब्रिटीशांनी ही व्यवस्था त्यांच्या सोयीसाठी बनवली होती. यात एसीऐवजी बर्फाचे तुकडे वापरण्यात आले. हे डब्याच्या तळाला ठेवले जात असत.
ट्रेनचे नाव काय?
ही ट्रेन 1 सप्टेंबर 1928ला मुंबईतल्या बॅलार्ड पिअर स्टेशनवरून दिल्ली, भटिंडा, फिरोजपूर आणि लाहोरमार्गे पेशावर (म्हणजे आताच्या पाकिस्तानमध्ये) सुरू झाली. मात्र मार्च 1930मध्ये सहारनपूर, अंबाला, अमृतसर आणि लाहोरकडे वळवण्यात आली. यामध्ये मात्र आधी जसं बर्फाचे तुकडे वापरून बोगी थंड ठेवण्याचं काम केलं जातं होतं तसं नसून त्यात एसी यंत्रणा जोडण्यात आली. या ट्रेनचं नाव फ्रंटियर मेल असं होतं. नंतर 1996मध्ये गोल्डन टेंपल मेलच्या या नावानं ती सुरू झाली.
ब्रिटीश काळातली सर्वात लक्झरी ट्रेन
फ्रंटियर मेल ही ब्रिटीश काळातली सर्वात लक्झरी गाड्यांपैकी एक समजली जात असे. आधी ती वाफेवर 60 किमी वेगानं चालत होती. पण आता ती विजेवर चालते. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ही ट्रेन 1893 किमी अंतर कापते. यात ती 35 रेल्वे स्थानकांवर थांबते आणि तिच्या 24 डब्यांमध्ये सुमारे 1300 प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे रेल्वेला या माध्यमातून चांगला महसूलदेखील मिळतो. कारण एसीचं तिकीट जनरल आणि स्लीपरपेक्षा जास्त असल्यानं रेल्वेला यात आर्थिक फायदा होताना दिसून येतो. तार वाहून नेण्यासाठी आणि आणण्यासाठी देखील याचा वापर केला जात असे. या ट्रेनला जवळपास 95 वर्षे झाली आहेत.