Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC special train: स्वातंत्र्य लढ्यातल्या ठिकाणांना भेट द्या, तीही स्वस्तात! रेल्वे साजरा करणार अनोखा स्वातंत्र्य दिन

IRCTC special train: स्वातंत्र्य लढ्यातल्या ठिकाणांना भेट द्या, तीही स्वस्तात! रेल्वे साजरा करणार अनोखा स्वातंत्र्य दिन

Image Source : www.tourmyindia.com

IRCTC special train: स्वातंत्र्याचा उत्सव रेल्वे आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करणार आहे. आयआरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) आपल्या प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे स्वस्तात हा पर्याय उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून ऐतिहासिक ठिकाणांना भेट देता येणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, भारतीय रेल्वे (Indian Railways) एक विशेष भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) घेऊन येत आहे. स्वातंत्र्य लढ्याशी (Freedom Fight) संबंधित अनेक ठिकाणांना या माध्यमातून भेट देण्यात येणार आहे. यासंदर्भात रेल्वेनं एक निवेदन दिलं आहे. त्यात म्हटलं, की 'आझादी की अमृत यात्रा' (Azadi ki Amrit Yatra) 22 ऑगस्ट रोजी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकापासून सुरू होईल आणि गुजरातमधल्या अहमदाबाद, केवडिया आणि सुरत, महाराष्ट्रातल्या शिर्डी आणि नाशिक तसंच उत्तर प्रदेशातल्या झाशी याठिकाणी जाईल.

अहमदाबादला पहिली ट्रेन

आठ रात्री आणि नऊ दिवसांच्या या रेल्वे प्रवासातला पहिला थांबा अहमदाबाद इथं असणार आहे. महात्मा गांधी ज्याठिकाणी राहत होते आणि जे स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख केंद्र होतं, ते हे ठिकाण आहे. या ट्रेनचे प्रवासी साबरमती आश्रम, दांडी कुटीर आणि अक्षरधाम मंदिरालादेखील भेट देतील. रात्रीच्या थांब्यानंतर ट्रेन केवडियाला जोडणाऱ्या एकता नगर रेल्वे स्थानकाकडे रवाना होईल. याठिकाणी नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे.

सुरतमध्येही ट्रेनचा कॅम्प

पर्यटक रात्रीच्या प्रवासानंतर गुजरातमधलं दुसरं सर्वात मोठं शहर सुरत याठिकाणी पोहोचतील. इथं लोक बारडोलीतल्या सरदार पटेल संग्रहालय आणि दांडी बीचवरच्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह संग्रहालयाला भेट देतील. यानंतर ही ट्रेन पुण्यात पोहोचेल. इथं प्रवाशांना आगाखान पॅलेसला भेट देता येणार आहे. भारत छोडो आंदोलनात कस्तुरबा गांधींसोबत महात्मा गांधींना इथं ओलीस ठेवण्यात आलं होतं. येरवडा जेललादेखील पर्यटक भेट देतील. इथं पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांना ठेवण्यात आलं होतं. यासंदर्भात आयआरसीटीसीनं ट्विट करून माहिती दिली होती.

केसरी वाड्यात जाणार प्रवासी

पर्यटक केसरी वाड्याला भेट देतील. मराठी आणि इंग्रजी भाषेत बाळ गंगाधर टिळकांनी इथून केसरी वृत्तपत्र काढलं होतं. पुण्यात एक रात्र विश्रांती घेतल्यानंतर पर्यटक भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठीदेखील जाणार आहेत. सातव्या दिवशी ही ट्रेन शिर्डीला पोहोचेल. यानंतर शनि शिंगणापूर, नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन घेतलं जाईल.

ट्रेनचं स्वरूप कसं?

महाराष्ट्रातून ट्रेन झाशीला भेट देईल. तिथं झाशीचा किल्ला पाहता येणार आहे. ही ट्रेन एकूण 3600 किलोमीटर अंतर कापणार आहे. या डिलक्स वातानुकूलित ट्रेनमध्ये दोन रेस्टॉरंट, एक स्वयंपाकघर, प्रत्येक डब्यात स्नानगृह आणि एक छोटी लायब्ररी असं एकूण स्वरूप असणार आहे.