WhatsApp वरून मॅसेज पाठवताना तुमच्याकडून एखादा मॅसेज चुकीच्या माणसाला किंवा नको त्या ग्रुपला सेन्ड झाला की, आपली त्रेधातिरपिट होते. म्हणजे आता मी काय करू? अशी अवस्था होते आणि त्यात आपण लगेच तो मॅसेज डिलिट करतो. पण तो मॅसेज फक्त आपल्यापुरता डिलिट झालेला असतो. कारण आपण घाईघाईत ‘Delete for everyone’ याऐवजी ‘Delete for me’ यावर क्लिक करतो आणि ज्यांना मॅसेज गेला पाहिजे असे आपल्याला वाटत असते. त्यांना मात्र मॅसेज पोहोचलेला असतो.
पण आता व्हॉट्सअॅपच्या लक्षात ही गोष्ट आली असून व्हॉट्सअॅपने यावर नवीन फीचर आणले आहे. ज्याद्वारे एखाद्या युझरने ‘Delete for Everyone’ च्या ऐवजी ‘Delete for me’ यावर क्लिक केल्यास त्याला ते अनडू (Undo) करण्याची सुविधा व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिली. व्हॉट्सअॅपने याची अधिकृत घोषणा केली असून या नवीन फीचरला ‘अक्सिडेंटल डिलिट’ (Accidental Delete) असे नाव देण्यात आले आहे. या फीचरद्वारे तुम्ही 5 सेकंदाच्या अवधीत ‘Delete for me’ चा पर्याय Undo करू शकता आणि पुन्हा तुम्हाला हवा असलेला ‘Delete for Everyone’ हा पर्याय निवडून तुम्ही तुमची चूक सुधारू शकता.
व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर आयफोन आणि अॅण्ड्रॉईड (iPhone & Android) अशा दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध असणार आहे. तसेच अमेरिकेतील टेक क्रंच (TechCrunch) या टेक्निकल पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन फीचर वैयक्तिक आणि ग्रुप चॅट असे दोन्हीसाठी उपलब्ध असणार आहे.
व्हॉट्सअॅपने 2017 मध्ये Delete for Everyone हा पर्याय दिला होता. त्यामुळे ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक पातळीवर एखादा चुकीचा मॅसेज आला की, मॅसेज पाठवणाऱ्याला तो डिलिट करण्याचा पर्याय मिळाला होता. सुरूवातीला ही सुविधा फक्त 7 मिनिटांसाठी उपलब्ध होती. पण ऑगस्ट, 2022 मध्ये ही मर्यादा 60 तासापर्यंत वाढवण्यात आली आहे.