Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Scam : तुम्हालाही येतायत आंतरराष्ट्रीय कॉल्स? व्हाट्सअ‍ॅपनं केलं सावध, तक्रार करण्याचं आवाहन

WhatsApp Scam : तुम्हालाही येतायत आंतरराष्ट्रीय कॉल्स? व्हाट्सअ‍ॅपनं केलं सावध, तक्रार करण्याचं आवाहन

WhatsApp Scam : तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स येत असतील तर सावधान. अलिकडे व्हाट्सअ‍ॅपवर अनोळखी क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात कॉल केले जात आहेत. काहींना मध्यरात्री तर काहींना दिवसा वेळी-अवेळी हे कॉल येत आहेत. त्यामुळे याविषयी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

व्हाट्सअ‍ॅपवरून मागच्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय कॉल्स (International calls) केले जात आहेत. हे कॉल रिसीव्ह करण्याच्या आधीच डिस्कनेक्ट होत आहेत. एका क्रमांकावरून सलग कॉल केले जातात. तसंच रिसीव्ह करण्याच्या आधीच कॉल कट केला जातो. अशाप्रकारचा अनुभव अनेकांना आल्यानं त्यासंबंधीच्या तक्रारी (Complaints) करण्यात आल्या. याप्रकरणी आता सायबरदोस्तनं (Cyber Dost) सावध केलंय. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर (Twitter) सजग राहण्याचं म्हटलंय. ज्यांना अशाप्रकारचे कॉल्स येत आहेत, त्यांनी आधी तक्रार करावी तसंच संबंधित क्रमांक त्वरीत ब्लॉक (Block) करावा, असं सायबर दोस्तनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. नेमका प्रकार काय आहे, याविषयी जाणून घेऊ...

फसवणूक करण्याचा उद्देश

आजकाल अनेक यूझर्सना व्हाट्सअ‍ॅपवर आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत आहेत. या कॉल्सच्या माध्यमातून सायबर चोरटे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे कोणाचीही फसवणूक होण्याआधी सावध व्हा. सायबर दोस्तनं आता यासंबंधी काही टिप्स फॉलो करायला सांगितल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, की अनेक व्हाट्सअ‍ॅप यूझर्सना विविध क्रमांकावरून बनावट आंतरराष्ट्रीय कॉल येतायत. यूझर्सनी हे नंबर त्वरित ब्लॉक करायला हवेत. यासंबंधीची तक्रार करावी. तर यामाध्यमातून तुमची कोणतीही ऑनलाइन पद्धतीनं आर्थिक फसवणूक झाली असेल तर लगेच सायबर क्राइमच्या (#cybercrime) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा #Dial1930 डायल करून तक्रार करावी.

यूझर्सच्या तक्रारी

मागच्या काही काळात सातत्यानं यात वाढ होत असल्यानं अनेक यूझर्स गोंधळले आहेत. खरं तर हे कॉल नसून मिस्ड कॉल्स असतात. कारण रिसीव्ह करण्याच्या आधीच ते कट केले जातात. विविध देशांतून हे कॉल केले जातात. कधी कधी मेसेजच्या माध्यमातून लिंकही पाठवली जाते. अशा लिंक क्लिक करणं महागात पडू शकतं. सायबर चोर परदेशातून अशाप्रकारची ऑनलाइन लूट करत असल्यानं शेवटी कारवाई करणं अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया होते. त्यामुळे सर्वात आधी सावधानता बाळगणं सर्वात महत्त्वाचं आहे.

'असा' ओळखा आंतरराष्ट्रीय क्रमांक?

अनेकांना आंतरराष्ट्रीय कॉल आणि त्यातून होणारी फसवणूक याबद्दल माहिती नसते. काही जण तर अशा क्रमांकावरून रिडायलही करतात. त्यामुळे फसवणुकीचा संभव असतो. त्यामुळे लक्षात ठेवावं, की भारतीय कॉल +91पासून सुरू होतात. हा भारताचा कोड आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणता कॉल येत असेल तर तो आंतरराष्ट्रीय नंबरवरून येत असल्याची खात्री करावी. ट्विटरवर एकूणच इथियोपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) यांसारख्या परदेशातून कॉल येत असल्याचं सांगत आहेत.

कसा ब्लॉक करायचा आंतरराष्ट्रीय क्रमांक? 

  • सर्वात आधी व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) उघडा.
  • यानंतर, ज्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला होता त्यावर टॅप करा.
  • यानंतर, वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा.
  • यानंतर, ब्लॉकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून संबंधित बनावट आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक केला जाऊ शकतो.