भारतीय रिझर्व बँकेने 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद केल्या जातील असे जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन हजारच्या नोटा तशाही छापल्या जात नव्हत्या. 2016 साली नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सामान्य नागरिकांना नोटबंदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती, बँकांना देखील नोटांच्या बदलीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता.
2000 रुपयांच्या नोटेबाबत निर्णय घेताना मात्र आरबीआयने विशेष काळजी घेतलेली दिसते आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी नागरिकांना नोट बदलीसाठी मिळणार आहे. मागील नोटबंदीच्या वेळी झालेल्या चुका सुधारण्याची यावेळी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. 2016 साली झालेली नोटबंदी आणि आता 2000 रुपयांच्या नोटेबाबत घेण्यात आलेला निर्णय यांतील काही फरक जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
स्वतः प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली नाही
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता दूरदर्शनवर लाइव्ह येत स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1000 आणि 500 च्या नोटा चलनातून रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. स्वतः प्रधानमंत्री घोषणा करत असल्यामुळे अनेकांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले होते.
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि दहशतवादी कृत्यांना लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मात्र तशी कुठलीही घोषणा प्रधानमंत्र्यांकडून केली गेली नाहीये.
अचानक नोटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे मोदी सरकारवर टीकेची झोड उठली होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील गेले होते. पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्याचा सरकारने प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
Rs 2000 currency note will remain legal tender after 30th September too. RBI expects that 4 month time is enough for people to exchange notes with the banks. Most of the Rs 2000 notes that are in circulation will return to banks within the given time frame of 30th September. This… pic.twitter.com/zdQUDVhOKS
— ANI (@ANI) May 19, 2023
नोट बदलीसाठी पुरेसा वेळ
8 नोव्हेंबर 2016 रोजी मध्यरात्रीपासून 1000 आणि 500 च्या नोटांना चलनी नोटा म्हणून कायदेशीर मान्यता नसेल असे जाहीर करण्यात आले होते. ज्यांच्याकडे या नोटा होत्या त्यांना नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अनेकांच्या घरी लग्नकार्य, बांधकाम, घर खरेदी अशा वेगवगेळ्या कामांसाठी रोख रक्कम होत्या. त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
यावेळी मात्र 31 सप्टेंबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोट जमा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना 2016 च्या तुलनेत फारसा त्रास होणार नाहीये.
बँकांचे कामकाज सुरूच राहणार
8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेताना 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबरला देशभरातील एटीएम सेंटर्स बंद राहतील असा निर्णय घेतला गेला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये गोंधळ अधिकच वाढला. दैनंदिन कामासाठी, खर्चासाठी चलनी नोटांचा तुटवडा भासू लागल्यामुळे कष्टकरी, कामगार वर्गाला अधिक झळ पोहोचली होती.
यावेळी मात्र देशभरातील बँका आणि एटीएम सेंटर्स सुरळीत त्यांचे काम करणार आहेत असे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे लोकांना मनस्ताप होणार नाहीये.
₹2000 Denomination Banknotes – Withdrawal from Circulation; Will continue as Legal Tenderhttps://t.co/2jjqSeDkSk
— ReserveBankOfIndia (@RBI) May 19, 2023
2000 च्या नोटा कायदेशीर निविदा
8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेताना 1000 आणि 500 च्या नोटा या कायदेशीर निविदा, म्हणजेच कायदेशीर चलन म्हणून मानले जाणार नाही असे सांगण्यात आले होते. यावेळी मात्र 2000 च्या नोटा केवळ चलनातून काढल्या जाणार असून या नोटांना कायदेशीर चलन म्हणून मान्यता असेल.
बँकांनाही निर्देश
आरबीआयने 2000 च्या नोटबंदीबाबत देशभरातील बँकांना कारवाईबाबत निर्देश दिले आहेत. तसेच नोट बदलीसाठी नियोजन करता यावे यासाठी पुरेसा वेळ देखील दिला आहे. तसेच नोट बदलीसाठी आणि पैसे जमा करण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना आणि दिव्यांगांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी खास खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्रामीण भागात जिथे बँकेची सुविधा नसेल अशा ठिकाणी मोबाईल व्हेईकलद्वारे बँक सुविधा देण्याचा प्रस्ताव देखील देण्यात आला आहे.