हिमाचल प्रदेश सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित कर वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने डिझेलवरील व्हॅटमध्ये प्रती लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे रविवार 8 जानेवारी 2023 पासून तेथे डिझेल दरात वाढ झाली.
हिमाचल प्रदेशात नुकताच निवडणुका पार पडल्या. यात कॉंग्रेस पक्षाला बहुमत मिळाले होते. कॉंग्रेस नेतृत्वाने सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या गळात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली होती. आठवडभरापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. आता कॅबिनेटमध्ये नऊ आमदारांचा समावेश झाला आहे. सात नव्या मंत्र्यांना रविवारी शपथ देण्यात आली. यात हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारने इंधन दरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करात 3 रुपयांची वाढ केली. डिझेलवर आता 7.40 रुपये व्हॅट आकारला जाणार आहे. यापूर्वी तो डिझेलवर 4.40 रुपये व्हॅट होता. डिझेलमधील व्हॅट वाढवण्यात आला असला तरी दुसऱ्या बाजुला सरकारने पेट्रोलवरील व्हॅट प्रति लिटर 55 पैशांने कमी केला आहे. व्हॅट करात वाढ केल्याने रविवारपासून हिमाचलमध्ये डिझेल महागले आहे. एक लिटरचा भाव 86 रुपये इतका वाढला आहे.