Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Village of Fruits in Satara: साताऱ्यातील छोटंस खेडेगाव महाराष्ट्रात चमकलं; 'फळांच गाव' म्हणून धुमाळवाडीचा गौरव

Dhumalwadi village in satara

जेमतेम बाराशे लोकसंख्या असलेल्या धुमाळवाडीनं फळशेतीचा आदर्श घालून दिला आहे. गावामध्ये 19 पेक्षा जास्त फळांची यशस्वी लागवड केली जाते. छोट्याशा गावाची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त आहे. 'फळांचं गावं' कसं नावारुपाला आलं वाचा.

Village of Fruits in Satara: सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे छोटंस गाव महाराष्ट्रात फळांचं गाव म्हणून नावारुपाला आलं आहे. फलटण जिल्ह्यातील धुमाळवाडी हे डोंगरदऱ्यातील गावात 19 पेक्षा जास्त फळांची लागवड केली जाते. गावाची एकूण उलाढाल 25 कोटींपेक्षाही जास्त आहे.

व्यापारी येतात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर 

येथील शेतकऱ्यांना फळं घेऊन बाजारात जावं लागत नाही तर थेट व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. ही कमाल या गावाने करून दाखवली आहे. (Dhumalwadi village in Satara) नुकतेच कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी 'व्हिलेज ऑफ फ्रूट्स' असा सन्मान धुमाळवाडीचा केला. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला. शेतकऱ्यांना शुभेच्छा पत्रही सरकारतर्फे देण्यात आले.   

अनुकूल हवामान अन् भौगोलिक परिस्थिती 

डोंगराळ भाग असल्याने गावात सगळीकडे मुरमाड जमीन आहे. 1985 सालापासून गावात डाळिंबाची लागवड केली जात होती. मात्र, 1990 सालापासून तेल्या आणि मर रोगाने डाळिंबाचं मोठं नुकसान होऊ लागलं. त्यामुळे शेतकरीही हैराण झाले. मात्र, त्यांनी आशा सोडली नाही. इतर फळं घेऊन त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. सध्या गावातील 90% शेतकरी फळशेती करतात. 

19 पेक्षा जास्त फळांची लागवड 

चिंच, अंजिर, केळी, जांभुळ, ड्रॅगनफ्रुट, द्राक्षे, पेरु, सिताफळ, डाळिंब, आवळा, चिकू, लिंबू, संत्रा, बोर, नारळ, आंबा, पपई अशा फळांची यशस्वी लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. ही उच्च दर्जाची फळे खरेदी करण्यासाठी देशभरातून व्यापारी धुमाळवाडीत येतात. 

शाश्वत विकासाचा आदर्श नमुना 

डोंगराळ भागातील या गावात पाण्याची कमतरता देखील आहे. फळशेतीसाठी पाणी वेळेवर लागते. मात्र, सूक्ष्म जलसिंचनाद्वारे पाणी टंचाईचा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवला. शाश्वत विकासाचा आदर्श नमुना धुमाळवाडीने देशाला घालून दिला आहे. इतर भागातील तरुण नोकरीसाठी शहराकडे वळतात. मात्र, धुमाळवाडीतील तरुणांनी फळशेती करून अनेकांच्या हाताला रोजगार दिल्याचं स्थानिक शेतकरी अभिमानानं सांगतात. 

धुमाळवाडीत फक्त 371 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे. त्यातील 258 हेक्टर जमिनीवर फळशेती होते. कॅनॉल, बोअरवेल, शेततळ्याद्वारे शेतीला पाणी मिळतं. अनेक शेतकऱ्यांकडून सेंद्रिय खतांचा देखील वापर केला जातो. गावात जेमतेम 200 घरं असून फळ शेतीची उलाढाल 25 कोटींवर पोहचली आहे. 

फळ प्रक्रिया उद्योगासही सुरुवात 

गावामध्ये फळांचे उत्पादन जास्त होत असल्याने काही शेतकऱ्यांनी फळ प्रक्रिया प्रकल्पही सुरू करण्याचे नियोजन आखले आहे. द्राक्षांची परदेशात निर्यात करण्यास काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. धुमाळवाडीनं आपलं स्वतं:चं अस्तित्त्व निर्माण केल्यानं राज्य सरकारने देखील या गावाची दखल घेतली.