Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Maize Summit : इथेनॉलसाठी वाढणार मक्याची मागणी, 'फिक्की'च्या समिटमध्ये काय म्हणाले जाणकार?

India Maize Summit : इथेनॉलसाठी वाढणार मक्याची मागणी, 'फिक्की'च्या समिटमध्ये काय म्हणाले जाणकार?

India Maize Summit : इथेनॉलच्या उत्पादनासाठी मक्याची वाढती मागणी पाहता याचं उत्पादनही वाढवावं लागणार आहे, अशी गरज इंडिया मेझ समिटमध्ये व्यक्त करण्यात आली. फिक्कीतर्फे 9व्या इंडिया मेझ समिटमध्ये सहभागी तज्ज्ञांनी याविषयीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मूल्य साखळीतला तोटा कमी करण्यावर एकमत

इथेनॉल (Ethanol) आणि पोल्ट्री उद्योगासाठी धान्याची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी पाहता देशातलं मक्याचं (Maize) उत्पादन पुढच्या पाच वर्षांत 4.4-4.5 दशलक्ष टनांपर्यंत वाढवणं गरजेचं आवश्यक आहे, असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी या समिटमध्ये व्यक्त केलं. संपूर्ण मका मूल्य साखळीतला तोटा पद्धतशीरपणे कमी करण्याच्या गरजेवरही त्यांनी यावेळी भर दिला.

4.4-4.5 दशलक्ष टनांपर्यंत उत्पादन वाढीचं उद्दिष्ट

शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी उद्योगांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असं राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. सध्या देशात मक्याचं उत्पादन 3.3 ते 3.4 दशलक्ष टन आहे. इथेनॉल आणि पोल्ट्री उद्योगासाठीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुढच्या पाच वर्षांत मक्याचं उत्पादन 4.4-4.5 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची गरज आहे. हवामान बदलाचा धोका कायम असतो. अशा परिस्थितीत दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता सुधारणं, साठवण आणि विपणन संबंध प्रस्थापित करणं, सार्वजनिक आणि खासगी भागीदारी निर्माण करणं अशा काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करायला हवं, असं आहुजा यांनी सांगितलं.

खासगी कंपन्यांना सरकार मदत करणार

कृषी मंत्री अब्दुल सत्तारदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनीही राज्यातलं मका उत्पादन वाढवण्यावर भर दिला. मका तसंच इथेनॉल उत्पानाच्या मूल्य साखळीत ज्या कंपन्या गुंतवणूक करतील, त्या कंपन्यांना सरकार मदत करेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. इथेनॉल तयार करण्यासाठी मक्याचा वापर करता येतो. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे, असं ते म्हणाले.

उत्पादनाचा साठा करण्यासाठी गोदामं उभारण्याचं आवाहन

यात एक महत्त्वाची बाब म्हणजे, मका उत्पादकांना आपल्या उत्पादनाचा साठा करून ठेवण्यासाठी जागा हवी. याकामी खासगी कंपन्यांनी राज्यात गोदामं उभी करावीत, असं आवाहन सत्तार यांनी खासगी कंपन्यांना यावेळी केलं. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा साठा करून ठेवता येईल. तसंच ज्यावेळी भाव असेल त्यावेळी विक्री करता येईल, असं ते म्हणाले. दरम्यान देशात उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. त्या पार्श्वभूमीवर इथेनॉलसाठी योग्य वातावरणनिर्मिती करण्यासाठी काय करता येईल, यावर या समिटमध्ये चर्चा झाली.