मुदत ठेवी (FDs) हा गुंतवणुकीसाठी लोकप्रिय असा पर्याय आहे. गेल्या एकाही वर्षात मुदत ठेवीत सातत्याने गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र आहे. मे 2022 पासून रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केली आहे. नागरिकांचे EMI जरी वाढले असले तरी मुदत ठेवीवर त्यांना चांगला परतावा दिला जातो आहे. त्यामुळे नागरिकांनी बचतीकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसते आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांचे एफडी व्याजदर तीन टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.फायनान्शियल एग्रीगेटर बँक बाजारच्या (BankBazaar) सर्वेक्षणानुसार भारतीयांची एफडीमध्ये सरासरी 42,573 रुपयांची गुंतवणूक आहे.
दिल्ली आणि महाराष्ट्र आघाडीवर
बँक बाजारच्या सर्वेक्षणानुसार, देशात सध्या 2.42 कोटी मुदत ठेवींची खाती आहेत. ज्याचे एकूण मूल्य जवळपास 103 लाख कोटी रुपये इतके आहे. या सर्व गुंतवणुकीत दिल्लीकरांनी आघाडी घेतल्याचे दिसते आहे. दिल्लीतील एकूण FD खात्यांची माहिती घेतल्यास सरासरी 80,872 रुपये खातेदारांनी मुदत ठेवीत गुंतवले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता, महाराष्ट्रात उघडलेल्या एकूण गुंतवणूक खात्यात लोकांची सरासरी गुंतवणूक 73,206 रुपये इतकी आहे. गुंतवणुकीच्या रकमेच्या बाबतीत दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल 68,323 रुपयांच्या सरासरी गुंतवणुकीसह ईशान्येकडील मिझोराम या राज्याचा तिसरा क्रमांक आहे.
महागाईत बचतीला प्राधान्य
खरे तर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ केली जाते. लोकांनी पैसा काळजीपूर्वक खर्च करावा आणि पैशाची अधिकाधिक बचत करावी हा यामागे हेतू असतो. रेपो रेट वाढवल्यानंतर व्याजदर देखील वाढतात. अशा परिस्थिती चांगला परतावा मिळेल म्हणून गुंतवणूकदार पैसे खर्च न करता गुंतवणुकीला प्रधान्य देतात. गेल्या वर्षभरात हेच चित्र दिसते आहे.
कोणत्या राज्यात किती गुंतवणूक?
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एफडीमध्ये सर्वाधिक रक्कम गुंतवणारे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी एफडीमध्ये 25.14 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत, इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल 10.97 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह दिल्ली एनसीआरचा नंबर आहे. तर कर्नाटक 8.17 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच एकूण FD च्या रकमेचा विचार केला तर सर्वाधिक 25% रक्कम ही महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांनी गुंतवली आहे. तर दिल्लीतील गुंतवणूकदारांचा हिस्सा 10% इतका आहे.