Life Insurance on debit card : आजच्या युगामध्ये प्रत्येकांकडे आरोग्यविमा, मेडिक्लेम, जीवनविमा यासोबत दोन-तीन पॉलिसी असणं महत्त्वाचं मानलं जातं. तरी काहीजण विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, जर तुम्ही डेबिट म्हणजे एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्या बँकेकडूनच तुम्हाला जीवनविमा दिलेला आहे. गोम अशी आहे की, आपल्याला हे ठाऊकच नसतं आणि डेबिट कार्ड घेतेवेळी बँकेकडूनही आपल्याला या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. म्हणून आजचं तुम्ही तुमच्या बँकेत संपर्क करुन तुम्ही वापरत असलेल्या डेबिट कार्डवर जीवनविमा आहे की नाही आणि तो किती रूपयाचा आहे याची माहिती घ्या. तर पाहुयात कोणत्या बँकेच्या डेबिट कार्डवर आहे जीवनविमा.
एसबीआय (SBI), कोटक महिंद्रा आणि एचडीएफसी बँक
एसबीआय बँकेच्या एटीएम कॉर्डवर आपल्याला जीवनविमा मिळतो. एखाद्या अपघातामध्ये कार्डधारकांचा मृत्यू झाला तर एसबीआय बँकेच्या कार्डाच्या प्रकारानुसार त्या व्यक्तिच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळते. कोटक महिंद्रा बँकेकडून डेबिट कार्डधारकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर 25 लाखापर्यंतचा विमा दिला जातो. तर एचडीएफसी बँकेकडून कार्डधारकांच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबियांना 5 लाखापर्यंतचा विमा दिला जातो. मात्र, विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यास 1 कोटी पर्यंतचा विमा मिळतो.
विम्याच्या दाव्यासाठी बँकेच्या अटी
या विम्यावर दावा करताना बँकेची अशी अट आहे की, कार्डधारकाने गेल्या 90 दिवसांमध्ये त्याच्या डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार केलेला असावा. जर तुमचे त्या बँकेतील खाते सक्रिय नसेल, त्या डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार करत नसाल तर तुम्ही या जीवनविम्यावर दावा करु शकत नाही.
बँकेमध्ये अपघाती विम्यासाठी दावा कसा करावा
डेबिट कार्डधारकांचा अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबिय पोलिसांच्या साहय्याने बँकेकडे विम्यासाठी दावा करू शकतात. यावेळी कुटुंबियांकडे मृत व्यक्तिचे पोस्टमार्टम रिपोर्ट, मृत्यूचे प्रमाणपत्र, पोलिसांचा अहवाल आणि ड्रायव्हिंग परवाना ही कागदपत्रे बँकेपुढे सादर करावे लागतात. यावेळी गेल्या 90 दिवसात मृत कार्डधारकांने त्या बँकेच्या डेबिट कार्डमार्फेत केलेल्या व्यवहाराची सुद्धा खातरजमा करावी.