तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यतिरिक्त जर एखादा जोडधंदा आणि तो ही घर बसल्या करायला मिळाला तर कुणाला ते आवडणार नाही. आपल्या अवती भवती अशी डबल कमाई करणारे लोक आपण पाहतोय. आणि अनेकदा ही तरुण मुलं असतात. शिवाय अलीकडे टेलिमार्केटिंग, ऑनलाईन शॉपिंग या प्रकारांमुळे अशी फ्रिलान्स कामं वाढलीही आहेत.
पण, यातली सगळीच सुरक्षित नसतात. आणि त्यामुळे मोठी फसगत होऊ शकते , जशी डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणाची झाली.
32 वर्षाचा हा तरुण (नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.) डोंबिवली जवळच महापे या नवी मुंबई उपनगरात एका कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत होता. 29 नोव्हेंबरच्या दिवशी त्याच्या वॉट्सअॅपवर एक संदेश झळकला . त्यात एका पार्ट टाईम नोकरीसाठी दर महा 18,000 रुपये त्याला देऊ करण्यात आले.
हे काम फ्रि लान्स म्हणजे आताची नोकरी करून करता येण्यासारखं होतं. त्यामुळे तरुणाला या मेसेजनं भुलवलं. पुढे समोरच्या व्यक्तीने त्याला www.bakelang.com ही लिंक पाठवली. आणि त्याबरोबर पाठवला एक अॅक्टिवेशन कोड. या तरुणाने सांगितल्या प्रमाणे वेबसाईटवर जाऊन नोंदणी केली. आणि पुढे 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान या तरुणाने आपल्या दोन बँक खात्यांमधून सगळी मिळून 6,90,000 रुपये इतकी रक्कम नोकरी देऊ केलेल्या इसमाला ऑनलाईन हस्तांतरित केली.
या मधल्या काळात अशा इच्छूक उमेदवारांचा एक टेलिग्राम ग्रुप बनवण्यात आला होता. आणि हा सायबर गुन्हेगार त्या टेलिग्राम खात्यावर वारंवार वेगवेगळ्या लिंक टाकत होता.
www.neolr.com किंवा www.jrlrbts.com अशा त्या लिंक होत्या.
प्रत्यक्ष फ्रि लान्स कामाचं काही बोलणंच होत नाहीए आणि लिंकवरच्या नोंदणीत पैसे जातायत हे पाहून तरुणाला शंका आली. त्याने आधी जमा केलेले पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. ते काढण्याच्या प्रक्रियेत पैसे लवकर काढण्यासाठी त्याच्याकडून आणखी 2,17,500 रुपयांची मागणी करण्यात आली. तेव्हा मात्र तरुणाची गंडवले गेल्याची खात्री पटली. आणि त्याने काम करत असलेल्या ठिकाणी तुर्भे पोलीस ठाण्यात संपर्क केला.
आणि तिथे पोलिसांनाही हा सायबर गुन्हा असल्याची खात्री पटली. त्यांनी या प्रकरणी माहिती - तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.