CRB Scam : “प्रणवभाई मुझे पापड बेलना नहीं है, सीधा फ्राय किया हुआ पापड खाना है! वो भी कांदा-टमाटर के साथ”, हर्षद मेहता यांचा हा डायलॉग प्रमाण मानून त्यांना आदर्श मानणाऱ्या अनेक ट्रेडर्सनी शेअर मार्केटमध्ये “मी हर्षद मेहतांचा शिष्य आहे”, असा जयजयकार वेळोवेळी करून दाखवला आहे. सर्वसामान्यांना असे वाटत होते की, शेअर मार्केटमध्ये घोटाळा करणारा हर्षद मेहता हा एकटाच होता. पण त्याच्यानंतरही अनेक रथी-महारथी होऊन गेले आहेत. त्यांनी शेअर मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने का होईना आपले नाव कमावले. तर शेअर मार्केटच्या इतिहासातील असाच एक होता चेनरूप भन्साळी. ज्याने 1200 कोटी रुपयांचा घोटाळा केला. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड स्कॅम म्हणून सीआरबी स्कॅमचा उल्लेख केला जातो. 1996 मध्ये या स्कॅमने सगळे शेअर मार्केट दणाणून सोडले होते. चला तर मग जाणून घेऊयात काय होता हा CRB स्कॅम.
Table of contents [Show]
कोण आहे चेनरूप भन्साळी?
राजस्थान मधील सुजनगढ इथे चेनरूप भन्साळी यांचा जन्म झाला. कापसाचा धंदा करणाऱ्या सामान्य घरात त्यांचा जन्म झाला होता. पेशाने ते चार्टेड अकाउंटंट (Chartered Accountant) होते. त्यांनी CRB कन्सल्टन्सी (CRB Consultancy) नावाची फायनान्शिअल फर्म (Financial Firm) सुरु केली होती. या फर्ममधून त्यांना चांगले पैसे मिळत होते.
CRB स्कॅम!
चेनरूप भन्साळी यांनी 1985 मध्ये सुरु केलेल्या CRB कन्सल्टन्सी या फर्म पासूनच या स्कॅमला सुरुवात झाली होती. मोठमोठ्या ग्राहकांमुळे त्यांची कंपनी अल्पावधीत मोठी झाली होती. 1992 मध्ये त्यांनी CRB कन्सल्टन्सी फर्मचे नाव बदलून CRB कॅपिटल मार्केट्स (CRB Capital Markets) असे केले. त्यानंतर त्यांनी 1994 मध्ये CRB म्युच्युअल फंडस् (CRB Mutual Funds) आणि 1995 मध्ये CRB शेअर कस्टोडिअल सर्विसेस (CRB Custodial Services) अशा दोन नवीन फर्म सुरु केल्या. असे म्हटले जाते की, त्यांनी जवळजवळ 133 कंपन्या उभ्या केल्या होत्या. ज्यांचे अस्तित्व शून्य होते.
1200 कोटी रुपयांचा घोटाळा!
90च्या दशकात नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी सेक्टर (Non-Banking Finance Sector) मध्ये चांगली वाढ होत होती. त्याचवेळी पॉन्झी स्कीम्स (Ponzi Schemes) सुद्धा वाढू लागल्या होत्या. याच पॉन्झी स्कीम्सचा वापर भन्साळी यांनी त्यांच्या CRB स्कॅम मध्ये केला होता. भन्साळी यांनी पॉन्झी स्कीम्सचा वापर करून सुमारे 1200 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. भन्साळी ज्या फेक कंपन्या चालवत होते. त्यावर गुंतवणूकदार आंधळा विश्वास ठेवत होते. याच आंधळ्या विश्वासाचा फायदा घेत भन्साळी यांनी 1992 ते 1996 या कालावधीत फिक्स्ड डिपॉसिट (Fixed Deposits), बॉण्ड्स (Bonds) आणि डिबेंचर्स (Debenchers) या स्वरूपात मोठा निधी जमा केला. हे पैसे भन्साळी यांनी त्यांच्या डमी कंपन्यांमध्ये वळवले होते. त्यांच्या CRB कॅपिटल मार्केट या फक्त एका कंपनीने 176 कोटी रुपये फक्त 3 वर्षांत जमा केले होते. यावरून गुंतवणूकदार भन्साळींवर किती अंधपणे विश्वास ठेवत होते हे समजते.
भन्साळींकडून क्रॉस होल्डिंगचा वापर!
भन्साळी यांनी CRB म्युच्युअल फंडस् कंपनीद्वारे मार्केटमध्ये अरिहंत मंगल ग्रोथ स्कीम (Arihant Mangal Growth Scheme) आणली. या स्कीममधून कंपनी 230 कोटी रुपये गोळा करणार होती. त्यानुसार कंपनीने वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले होते. अनेक कंपन्या भन्साळींच्या कंपन्यांना फाईव्ह स्टार रेटिंग देत होते. त्यामुळे मोठमोठे गुंतवणूकदारसुद्धा भन्साळींच्या स्कीमकडे आकर्षित होत होते. याचाच फायदा घेत भन्साळी क्रॉस होल्डिंग्सचा (Cross-holding) वापर करू लागले. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्वत:च्याच कंपन्यांच्या मदतीने ते स्वत:च्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत होते. यामुळे त्यांच्या कंपन्या न नेहमी प्रॉफिटमध्ये असायच्या.
शेवटी चोरी पकडली गेली!
भन्साळी गुंतवणूकदारांकडून जेव्हा पैसे घ्यायचे तेव्हा त्यांना चांगला रिटर्न्स मिळवून देणे, बंधनकारक होते. सुरूवातीला त्यांना हे सहज जमत होते. पण कालांतराने त्यांना पैसे देणे कठीण जाऊ लागले. गुंतवणूकदारांकडून अधिकाधिक दबाव वाढू लागला. तसा त्यांनी मार्केटमधून अजून पैसे उचलण्यास सुरूवात केली. अशाप्रकारे 1995 मध्ये जेव्हा शेअर मार्केट क्रॅश झाले. तेव्हा त्यांच्या सर्व फायनान्स कंपन्यांचे पितळ उघडे पडले. तेव्हा त्यांनी जवळपास 1200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे दिसून आले. या दरम्यान, RBI आणि SEBI ला भन्साळीवर कशी आणि काय कारवाई करायची हेच समजत नव्हते. तेव्हा मिडियाने 1996 मध्ये भन्साळीचा घोटाळा बाहेर काढला आणि भन्साळीला अटक केली. या घोटाळ्यामुळे अनेक छोटे गुंतवणूकदार उध्वस्त झाले. त्यामुळे “कमी वेळात पैसे डबल” अशा स्कीम्सच्या भानगडीत न पडलेलेचे बरे!