भारतीय फार्मा कंपनी मॅरियन बायोटेकने बनवलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे (India Made Cough Syrup) 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तान सरकारने 29 डिसेंबरला केला होता. त्यानंतर मॅरियन फार्मा कंपनीने या कफ सिरपचे उत्पादन तत्काळ बंद केले होते. आता याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली आहे. Dok1 Max हा मॅरियन कंपनीने बनवलेला कप सिरप दूषित असल्याचे माहिती समोर आल्याने या औषधाचे उत्पादन तत्काळ थांबण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटनेने उझबेकिस्तान सरकारकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली आहे. नक्की मुलांचा मृत्यू कप सिरपने झाला की दुसऱ्या कोणत्या कारणाने झाला याचा शोध WHO देखील घेत आहे. यासंबंधीची सर्व माहिती सर्वोच्च आरोग्य यंत्रणेकडून तपासून पाहण्यात येत आहेत. दरम्यान, मॅरियन बायोटेक कंपनीचा परवाना उत्तर प्रदेश सरकारने जप्त केला आहे. तसेच कंपनीकडून या औषधाचे उत्पादनही बंद करण्यात आले आहे.
कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे मॅरियन बायोटेकचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, कंपनीने या संबंधित कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे परवाना रद्द करण्यात आला आहे, असे गौतम बुद्ध नगरचे औषध निरिक्षक वैभव बाबर यांनी सांगितले. कंपनीमधून औषधांचे नमुने घेतले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, असेही बाबर यांनी सांगितले.
हरयाणातील औषध कंपनीवरही प्रश्नचिन्ह
उझबेकिस्तान येथील कंपनीने दूषित औषधाचा दावा करण्याआधी गांबिया देशानेही ७० मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. हरयाणातील मायडेन फार्मा (Maiden Pharmaceuticals) कंपनीने बनवलेल्या औषधाच्या सेवानामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा गांबियाने केला होता. भारतीय फार्मा उद्योगाच्या विश्वासर्हतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.