वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याचे बजेट कोलमडून गेले आहे. भारतात या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या किचनपर्यंत जाऊन पोहोचला आहे. महाग झालेले मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला आणि किलोसाठी 150 रुपयांच्या टप्पा ओलांडलेल्या टोमॅटोने सर्व सामान्यांचे जेवण महाग केले आहे. मार्केटचा अभ्यास करणाऱ्या क्रिसील (Crisil) या कंपनीने एक थाळी जेवण तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबतचा( Food plate cost) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जुलै महिन्यात शाकाहारी जेवणाची थाळीसाठी येणाऱ्या खर्चामध्ये तब्बल 34 % टक्क्यांनी वाढ झाली आहे.
खाद्य पदार्थाच्या किमतीत वाढ
क्रिसीलने संपूर्ण भारतामधील खाद्य पदार्थाच्या वाढलेल्या किमतीचा अभ्यास करून एक जेवणाची थाळी बनवण्यासाठी सरासरी किती खर्च येतो त्याचा अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य माणसाच्या खर्चावर परिणाम दिसून येत आहे. त्याच प्रमाणे खाद्य पदार्थांच्याही किमतीत वाढ झाली आहे. यामध्ये तृणधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस या सर्व गोष्टींच्या किमती जेवणाच्या खर्चावर परिणाम करत असल्याचेही अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
टोमॅटोमुळे 25% खर्च वाढला-
या अहवालानुसार यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्यांदाच सलग तीन महिने जेवणाच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. शाकाहारी थाळीचा विचार केला असता महागलेले मसाले, भाजीपाला यामुळे हा खर्च 34 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये 25 टक्के खर्च हा केवळ टोमॅटोच्या किमतीमुळे वाढला असल्याचेही म्हटले आहे. जुलैमध्ये टोमॅटोचे दर हे जूनच्या तुलनेत 233% वाढले आहेत. तसेच कांदा 16% आणि आणि बटाट्याचे दर महिन्याला 9% वाढल्यामुळे जेवण तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चात आणखी वाढ झाली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच बरोबर या वाढत्या महागाईमुळे मासांहार जेवणाच्या खर्चात 13 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही क्रिसीलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.