कॉर्पोरेट बॉंडमधून भांडवली उभारणीमध्ये डिसेंबर महिन्यात प्रचंड वाढ झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये कॉर्पोरेट बॉंडमधून कंपन्यांनी 1.21 लाख कोटींचा निधी उभारला. त्याआधी नोव्हेंबर महिन्यात कॉर्पोरेट बॉंडमधून कंपन्यांनी 1.02 लाख कोटींचा निधी उभारला होता.
निधी उभारणीसाठी कॉर्पोरेट बॉंडचा वापर करण्याकडे मागील काही वर्षांत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर वाढीनंतर देशांतर्गत कर्जाचा दर वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी बॉंड इश्यूकरुन निधीची गरज भागवत असल्याचे बॉंड्सइंडियाचे संस्थापक अंकित गुप्ता यांनी सांगितले.
डिसेंबरमध्ये कॉर्पोरेट बॉंडमधून 1.21 लाख कोटी रुपये उभारले. यात नोव्हेंबरच्या तुलनेत 18.8% वाढ झाली. वार्षिक आधारावर डिसेंबर 2021 च्या तुलनेत 97.8% वाढ झाली. बँकांकडून टिअर -I आणि टिअर -II बॉंड इश्यू केले आहेत. मार्च 2017 नंतर बॉंडमधील निधी उभारणीत वाढ झाली आहे. यात एचडीएफसी, सिडबी, नाबार्ड, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या कंपन्यांनी वर्ष 2022 मध्ये बॉंड इश्यू केले.