Summer Products sale: प्रत्येक ऋतूनुसार बाजारात वस्तू आणि सेवांना मागणी असते. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी एसी, फ्रिज, कूलरसह अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री अचानक वाढते. या क्षेत्रातील कंपन्या खास उन्हाळ्यासाठी उत्पादन क्षमता वाढवतात. भारतात उन्हाळ्यात लग्नाचा सिझनही असतो. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने समर प्रॉडक्ट्सची मागणी रोडावली आहे. सोबतच शीतपेय, आइसक्रिमची विक्रीही 26% नी रोडावली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेला तुलनेने जास्त फटका बसला आहे.
अवकाळी पावसाचा मार्केटवर परिणाम
भाववाढीमुळे मागील काही महिन्यांपासून बाजारातील खरेदी रोडावली आहे. आरबीआयने व्याजदर वाढ केल्याने कर्जाचे हप्तेही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवलीय. त्यात आता अवकाळी पावसामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची आणि एफएमसीजी प्रॉडक्ट्सची मागणी रोडावली आहे. एअर कंडिशनर, कूलर, शीतपेये आणि आइसक्रिम या उत्पादनांची सर्वाधिक विक्री उन्हाळ्यात होते. वर्षभरातील खपाचा विचार करता 50% उत्पादनांची विक्री उन्हाळ्यातील तीन ते चार महिन्यात होते.
उत्तर भारतात समर प्रॉडक्ट्सची विक्री (एप्रिल)
एअर कंडिशनर विक्रीची वाढ 0%
रेफ्रिजरेटर विक्री -30% (वजा 30 टक्के)
आइसक्रीम विक्री -10% (वजा 10 टक्के)
मागील वर्षाच्या तुलनेत शीतपेयांची विक्री 26% रोडावली
उन्हाळ्यात विक्री होणाऱ्या एकूण उत्पादनांपैकी निम्मी उत्पादने उत्तर भारतात विक्री होतात. मात्र, यंदा उत्तर भारतात अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा अचानक खाली आला. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्याचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. अनेक कन्झ्युमर उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या त्यांच्या विक्री टार्गेटच्या मागे आहेत. समर सेलद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही कंपन्यांकडून सुरू आहे.
आघाडीच्या कंपन्यांची विक्री रोडावली
मे महिन्यात विक्री वाढण्याची आशा कंपन्यांना आहे. कारण, अवकाळी पावसामुळे लग्नसमारंभाच्या तारखाही पुढे गेल्या आहेत. उत्तर भारतात तर फक्त एकच आठवडा कडक ऊन होते. मात्र, त्यानंतर ढगाळ वातावरणाने तापमान खाली आले. उत्तर भारतात ब्लू स्टार या एसी निर्मिती करणाऱ्या कंपनीची विक्री फक्त 15% वाढली. 30% विक्री वाढेल, असा अंदाज कंपनीला होता. मात्र, हे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. रेफ्रिजरेटरची देशभरातील विक्री 15% नी खाली आली आहे. एप्रिल महिन्यात उत्तर महिन्यात शीतपेयांची विक्री 26% नी खाली आली आहे.
अमूलचा उत्तर भारतातील खप कमी
डेअरी उत्पादनातील आघाडीची कंपनी अमूलच्या उत्पादनांची विक्रीही रोडावली आहे. आइसक्रीम, मिल्कशेक, बटरमिल्क आणि इतर उन्हाळी शेतपेय श्रेणीतीली उत्पादनांची विक्री कमी झाली आहे. अमूल कंपनीची उत्पादने संपूर्ण देशभरात विकली जातात. त्यामुळे उत्तर भारतात विक्री कमी झाल्याचा खूप मोठा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर झाला नाही, असे अमूल कंपनीचे संचालक जयेन मेहता यांनी म्हटले. उत्तर भारतातून ग्राहकांचा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे गोदरेज अप्लायन्सेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.