भारताच्या परदेशी व्यापाराशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती संबंधित व्यक्तींना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी निर्यात पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जून रोजी गुरुवारी नवीन निर्यात पोर्टल लाँच केले. या पोर्टलवर भारताच्या परदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती म्हणजेच आयात आणि निर्यात एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. विदेशी व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी वाणिज्य भवनाचे उदघाटनही केले आहे. ही नवीन इमारत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे केंद्र असेल.
काय आहे निर्यात पोर्टल
परदेशी व्यापाराशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्यासाठी निर्यात पोर्टल तयार केले गेले आहे. परदेशी व्यापारात गुंतलेल्या सर्व उद्योगांच्या माहितीसाठी हे एक-स्टॉप व्यासपीठ असेल. याचे पूर्ण नाव नॅशनल इम्पोर्ट-एक्सपोर्ट रेकॉर्ड फॉर अॅनालिसिस ऑफ ट्रेड (National Import-Export Record for Yearly Analysis of Trade) आहे. या पोर्टलवर देशात होत असलेल्या आयात-निर्यातीची सर्व माहिती असेल. निर्यात पोर्टल आणि वाणिज्य भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. हे व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात विशेषतः एमएसएमईसाठी सकारात्मक बदल घडवून आणतील. जे लोक व्यापार, वाणिज्य आणि एमएसएमई क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना नवीन वाणिज्य इमारतीचा लाभ मिळेल.
निर्यातीत 15 टक्यांची वाढ
गेल्या काही वर्षांत भारताच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मे 2022 मध्ये भारताने 37.29 अब्ज डॉलरची निर्यात केली. एक वर्षापूर्वी म्हणजेच मे 2021 मध्ये भारताने 32.30 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. याचा अर्थ भारताच्या निर्यातीत एका वर्षात 15.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताने 2021-22 या आर्थिक वर्षात 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात केली आहे. या निर्यात पोर्टलमधील माहितीचा व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.