वन्य प्राण्यांचा मानवी वसाहतीमध्ये शिरकाव करण्यासह मनुष्य अथवा पाळीव जनावरांवर हल्ला (wild animal attack ) करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: वन परिसरातील गावांमध्ये वाघ, बिबट्या, तरस, अस्वल, रानडुक्कर यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात कित्येकदा अनेकांचे जीव गेले आहेत किंवा गंभीर जखमी होऊन अपंगत्व आले आहे. अशा प्रकारे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यासंदर्भात सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नुकसान भरपाई संदर्भातील विधेयक मंजूर-
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास वन विभागाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, कित्येक वेळा नुकसान भरपाईची घोषणाच केली जाते. प्रत्यक्षात पीडित व्यक्ती अथवा त्यांच्या कुंटुंबाला मदत मिळण्यास खूप उशीर केला जातो. ही परिस्थिती टाळ्यासाठी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकानुसार यापुढे वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई पीडितास 30 दिवसाच्या आत मिळेल. तसेच ही भरपाई मिळण्यास दिरंगाई झाल्यास पीडितास त्या रकमेवर व्याज देण्यात येणार आहे.
अधिकार्याकडून व्याजाची वसुली-
विशेष म्हणजे हे व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाणार आहे. अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे. हे विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.
नुकसान भरपाईत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन-
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांची जीवितहानी झाल्याने आर्थिक नुकसान होते. तसेच वन्य प्राण्यांकडून कित्येक वेळा शेती पिकांची नासधूस करण्याचेही प्रकार घडतात. यासाठी सध्य स्थितीत राज्यशासनाकडून नुकसान भरपाई दिली जात आहे. मात्र, जीवितहानी, जनावरांचा मृत्यू, फळबागांचे नुकसान या संदर्भात योग्य याख्या करून भरपाईमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी सभागृहात दिली आहे. सरकारच्या या निर्णयाच्या अंमलबजावनीनंतर पीडित कुंटुबांना दिलासा मिळणार आहे.
किती मिळते नुकसान भरपाई?
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शासनाकडून मृताच्या वारसांना 10 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच गाय, म्हैस, बैल या पशुधन मृत्यूसाठी पशुपालकास वनविभागाकडून कमाल 40,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. यासह जखमी झाल्यासही कमी अधिक प्रमाणात अर्थ सहाय्य केले जाते. दरम्यान आता ही नुकसान भरपाई मिळण्यास 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास सुधारित विधेयकाप्रमाणे पीडितास रकमेवर व्याजही मिळणार आहे.