Coastal Road Work Delayed: कोस्टल रोड(Coastal Road) प्रकल्प हा मुंबईसाठी ड्रीम प्रोजेक्ट ठरणार आहे. हा प्रकल्प 14,000 कोटी रुपयांचा असून तो नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प उभारण्यात आला आहे. शिवाय मुंबईकरांना संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास यामुळे करता येईल असे अनेकांचे म्हणणे आहे. पण याच कोस्टल रोड संदर्भात एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. काय आहे अपडेट जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
कोस्टल रोडचे काम 6 महिन्यांसाठी का लांबणार?
मुंबई महानगरपालिकेकडून(BMC) कोस्टल रोडच्या प्रकल्पाअंतर्गत काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मच्छीमारांच्या बोटींसाठीच्या मागणीनंतर दोन खांबांमधील अंतर वाढवून 120 मीटर करण्यात आले होते. मात्र या बदलामुळे प्रकल्पाच्या कालावधीत वाढ होणार असून प्रकल्पाचा खर्चही वाढणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत अतिरिक्त अभियांत्रिकी कामाचा समावेश होणार असल्याने प्रकल्पाचा वेळ सहा महिन्यांनी वाढण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडच्या(Coastal Road) प्रकल्पाअंतर्गत याआधी प्रत्येक 60 मीटरच्या अंतरावर भर समुद्रात खांब टाकण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र मच्छीमारांच्या मागणीमुळे आता 120 मीटरच्या अंतरावर खांब टाकले जाणार आहेत. अगोदरच्या पद्धतीनुसार 3.5 मीटर व्यासाचा मोनोपायलिंग(Monopiling) केले जाणे अपेक्षित होते. परंतु 120 मीटर अंतरासाठी आणखी दोन अतिरिक्त खांबांची भर नव्याने प्रकल्पात पडणार आहे. तसेच या 120 मीटरच्या अंतरासाठी विशिष्ट मटेरिअलचा वापरही या टप्प्यातील अंतरासाठी करावा लागणार आहे. त्यानंतरच ब्रीज सक्षम होईल समुद्रात इतके अंतर कायम राखले जाणे प्रकल्पासाठी शक्य होईल.
कोणत्या तंत्रज्ञानाने ब्रीजची केली जाईल निर्मिती ?
दोन ब्रीजमध्ये 120 मीटरचे अंतर राखण्यासाठी केबल स्टेड, स्टील आर्क किंवा एक्स्ट्राडोज ब्रीज या तीन पद्धतीच्या ब्रीजचा विचार प्रकल्पासाठी केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या तिन्ही तंत्रज्ञानामध्ये कमी खर्चातील तंत्रज्ञान हे ब्रीज निर्मितीसाठी विचारात घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने सल्लागाराला आणि कंत्राटदाराकडे कमी खर्च लागणाऱ्या तंत्रज्ञानाची यासंदर्भात विचारणा केली आहे.