आरोग्य विमा आणि जीवन विम्याचे महत्व आता अनेकांना पटले आहे. कोविडनंतर तर सामान्य नागरिकांना विम्याचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. तुम्ही देखील कुठला ना कुठला विमा घेतला असेलच, परंतु विमा घेताना काही गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे.
जर तुम्ही विमा घेताना पूर्ण माहिती दिली नसेल, वेळेवर हफ्ते भरले नसतील तर तुमचा विमा क्लेम रद्द होऊ शकतो आणि तुम्हांला अपेक्षित असा फायदा मिळू शकत नाही. तुमचे संभाव्य नुकसान जर टाळायचे असेल तर विमा घेताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
प्रीमियम वेळेत भरा
विमा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वेळेत प्रीमियम भरणे. तुम्ही वार्षिक, तिमाही, सहामाही प्रीमियमचा पर्याय स्वीकारू शकतात. आपल्या आर्थिक नियोजनानुसार तुम्ही तुमचा प्रीमियम भरण्यासाठीचा पर्याय निवडू शकता. प्रीमियम भरण्यासाठी विमा कंपन्या तुम्हाला 30 दिवसांआधीच सूचित करत असतात. त्यामुळे तुम्ही विम्याचा क्लेम करणार असाल त्याआधी तुमचे नियमित प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
योग्य माहिती द्या
लाइफ इन्शुरन्स घेताना, विमाधारकाने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास, विमा दावा नाकारण्याची शक्यता वाढते. आरोग्य, वय, वजन, उंची किंवा उत्पन्न याबाबत चुकीची माहिती देणे, पॉलिसी घेताना विमाधारकाने चुकीची माहिती दिल्यास विमा दावा नाकारला जाऊ शकतो.
कॉन्टेस्ट कालावधी
विमा पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षांपर्यंतच्या कालावधीला स्पर्धा कालावधी म्हणतात. या काळात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी विमा दावा नाकारते. परंतु सर्वच प्रकरणात असे घडते असे नाही. परंतु या दरम्यान आलेल्या विमा क्लेमची कसून तपासणी केली जाते. या क्लेममध्ये तथ्य असेल तरच विमा आर्थिक लाभ देते.
नामनिर्देशित व्यक्तीची माहिती
विमा घेताना पॉलिसीधारक कुणा एका व्यक्तीचे नॉमिनेशन देत असतो. नामनिर्देशित व्यक्तीची संपूर्ण माहिती देणे यावेळी आवश्यक आहे. जर नामनिर्देशित व्यक्तीचे निधन झाल्यास पॉलिसीधारकाने याबाबत विमा कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. तसेच त्याजागी नवीन व्यक्तीला नामनिर्देशित करणे आवश्यक आहे.
तुम्ही देखील जर कुठली विमा पॉलिसी घेतली असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या. जेणेकरून तुम्हांला विमा क्लेम करताना कुठलीही अडचण येणार नाही.