लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा आपल्याला इन्शुरन्सची गरज नसते. कारण जेव्हा आपल्याला इन्सुरन्सची खरोखरच गरज असेल, तेव्हा आपल्याकडे इन्शुरन्स घेण्यासाठी वेळ उपलब्ध असेलच, असे नाही. अशी खरेदी म्हणजे लँडिंग पॅराशूटची खरेदी करण्यासारखे असते. “विना-पॅराशूट” विमानामधून उडी मारण्याची संधी पुन्हा-पुन्हा तर नक्कीच मिळणार नसते. थोडक्यात, आयुष्याची जोखीम अंतर्भूत असेल तर चान्स घेणे शक्य नसते. करिअर असो वा इन्शुरन्स असो, प्रत्येकाला “बॅक-अप” असणे म्हणजे “सेफ्टी नेट” असण्यासारखे अनिवार्य असते. कारण “बॅक-अप” प्लॅन्स तुम्हाला चिंतामुक्त निर्णय घेण्यास मदत करतात.
आपल्यापैकी बहुतेक जणांना एकापेक्षा अनेक इन्शुरन्स पॉलिसीजचे कव्हर त्यांच्या स्वतंत्र युनिक फीचर्समुळे असणे, नेहमीच आवश्यक वाटत असते. मात्र त्या पॉलिसींचासाठीचा उच्च प्रीमियम भरणे, सर्वांनाच शक्य नसते. काही पॉलिसीज “डेथ बेनिफिट” कव्हर करतात, काही पॉलिसीज ADD (Accidental Death & Dismemberment) म्हणजे अपघाती मृत्यू आणि एखादा अवयव निकामी होऊन अपंगत्व येण्याचा धोका कव्हर करतात, तर काही पॉलिसीज दुर्धर आजार अर्थात Critical illness झाल्यास होणारे नुकसान कव्हर करतात. काही पॉलिसी वेगवेगळ्या अनेक जोखमीना (Risks) एकाच छत्रीखाली “बॅक-अप कव्हर” तर देतात. पण अशा पॉलिसींना उच्च रक्कमेचा प्रीमियम भरावा लागतो, जो प्रत्येकाला शक्य होईलच असे नसते.
एकापेक्षा जास्त पॉलिसी आणि त्या सर्वांवर दावा करणे कायदेशीर आहे का?
होय निश्चितच. पॉलिसीधारक एकापेक्षा अधिक “लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज्” खरेदी करू शकतो आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदार पॉलिसीधारकाच्या असलेल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीजवर कायदेशीर हक्क देखील सांगू शकतो. मात्र पॉलिसीधारकाने एक पॉलिसी अस्तित्वात असताना त्याच प्रकारची जोखीम (Risk) कव्हर करणाऱ्या दुसऱ्या नवीन पॉलिसीसाठी अर्ज करायचा ठरविला, तर दोन गोष्टींची खुलासा त्याने केलेला असणे आवश्यक आहे -
(१) पॉलिसीधारकाने इन्शुरन्स कंपनीसमोर सर्व भौतिक तथ्ये (facts) उघड केलेली असणे, अनिवार्य आहे. पूर्वी विकत घेतलेल्या पॉलिसीजचे इन्शुरन्स कव्हर तसेच त्या पॉलिसीजची सद्यस्थिती इन्शुररसोबत शेअर न केल्यास किंवा जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याचे आढळून आल्यास, भविष्यामध्ये इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्सचा क्लेम नाकारू शकते.
(२) भौतिक तथ्यांसोबतच अस्तित्वात असलेल्या (“In force”) सर्व इन्शुरन्स पॉलिसींची एकत्रित विमा रक्कम (total life cover) किती आहे आणि ती पॉलिसीधारकाच्या मानवी जीवन मूल्यापेक्षा (Human Life Value) जास्त नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी इच्छूक पॉलिसीधारकाची असते. कारण इन्शुरन्स कंपनीची 'अंडररायटिंग' टीम पॉलिसी-प्रपोजल नुसार जोखिमेचे मूल्यांकन (Risk assessment) करते. एकापेक्षा अधिक पॉलिसीज् जरी असल्या, तरीदेखील मृत्यूचा एकत्रित क्लेम हा HLV म्हणजे मानवी जीवन मूल्यापेक्षा जास्त असून चालत नाही.
एकापेक्षा अधिक विमा पॉलिसी ठेवण्याचे काही फायदे आहेत काय?
प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचा “क्लेम सेटलमेंट रेशो” म्हणजे क्लेम सेटलमेंट करण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांकडून पॉलिसीज् घेऊन आपण आपली जोखीम (रिस्क) पसरवू शकतो, spread करू शकतो. कारण सगळीच अंडी एका बास्केटमध्ये ठेवायची नसतातच ना !!! या खेरीज, जेव्हा आपण एकापेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीज् घेतल्या असतील आणि आपल्या क्लेमची रक्कम ही एखाद्या पॉलिसीच्या रक्कमेपेक्षा (sum assured) पेक्षा जास्त असेल, तेव्हा आपण दोन स्वतंत्र क्लेम दोन वेगळ्या कंपन्यांकडे करून एकापेक्षा अधिक पॉलिसींकडून “कव्हरेज लाभ” मिळवू शकतो. आणि जेव्हा क्लेमच्या रकमेपेक्षा कव्हरेजची रक्कम (sum assured) जास्त असेल तर आपण कोणत्याही इन्शुररकडे क्लेम करू शकतो.
मात्र जेव्हा आपण एकापेक्षा जास्त पॉलिसी घेतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, आपण अतिरिक्त प्रीमियम भरत आहोत. त्यामुळे या निर्णयाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आपण आपल्या वाढत जाणाऱ्या आर्थिक गरजा आणि त्यानुसार बदलत जाणारे जीवनमान, यांचा विचार करून आवश्यक तेव्हा वाढीव कव्हरेज देणारी पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे.