खासगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेचा शेअर आज चर्चेत होता. आजच्या सत्रात सिटी युनियन बँकेच्या शेअरमध्ये 9% घसरण झाली. रिझर्व्ह बँकेने केलेल्या ऑडिटमध्ये सिटी युनियन बँकेच्या अनुत्पादित मालमत्तांच्या एकूण थकबाकीमध्ये 259 कोटींची तफावत आढळून आली आहे. या वृत्ताचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटले.
आरबीआयला ऑडिटमध्ये सिटी युनियन बँकेच्या एकूण बुडीत किंवा अनुत्पादित मालमत्तांमध्ये 259 कोटींची तफावत (additional gross non-performing assets-GNPAs) आढळून आली आहे. .यात एक कोटींहून अधिक थकबाकी असलेल्या 13 कर्ज खात्यांमध्ये 230 कोटींची आणि एक कोटींहून कमी थकबाकी असलेल्या 218 कर्ज खात्यांमध्ये 29 कोटींची तफावत आढळून आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या जोखीम व्यवस्थापनविषयक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्येच एनपीएमध्ये 259 कोटींची तफावत आढळून आली आहे. रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर या काळात विशेष लेखापरिक्षण केले होते. त्यात हा गैर प्रकार समोर आला असून बँकेने तपास सुरु केला आहे.
दरम्यान, या अहवालाचे पडसाद सिटी युनियन बँकेच्या शेअरवर आज उमटले. आज बाजार सुरु होताच सिटी युनियन बँकेचा शेअर 9% कोसळला होता. बाजार बंद होताना सिटी युनियन बँकेचा शेअर 5.24% घसरणीसह 179.00 रुपयांवर बंद झाला.