चिनी बनावटीच्या वस्तू भारतात प्रचंड खपतात हे जसं चीनने ओळखलं आहे तसंच भारतीयांनी देखील ओळखलं आहे. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेली चकमक, अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची वाढलेली घुसखोरी यामुळे भारत सरकार देखील आता सावधगिरी बाळगताना दिसते आहे. भारतात जर व्यापार करायचा असेल तर चीनी कंपन्यांना भारतीय मॅनेजरच नेमावे लागतील असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
स्मार्टटीव्ही, स्मार्टफोन, खेळणी, लॅपटॉप कंपन्यांची भारतात एक मोठी बाजारपेठ आहे. चीनी उत्पादने तुलनेने स्वस्त आणि टिकणारे असतात. त्यामुळे भारतीय नागरिकांची या उत्पादनांसाठी मोठी पसंती असते. Xiaomi, Oppo, Coolpad, OnePlus सारख्या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या भारतात त्यांचा व्यवसाय करत असून मोठा नफा देखील कमवत आहेत. भारतीय नागरिकांची खासगी माहिती चीनी कंपन्यांकडून गोळा केली जात असून त्याचा गैरवापर केला जात असल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर अनेक चायनीज गेम्स, लोन ॲप तसेच टिकटॉक सारखे व्हिडीओ ॲप भारत सरकारने बंद केले होते. त्यांनतर आता चायनीज कंपन्याच्या बाबतीत देखील भारत सरकारने आपली पकड घट्ट केली आहे.
चिनी मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल तर त्यांना त्यांच्या स्थानिक कामकाजासाठी भारतीय भागीदार निवडावे लागतील, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय चायनीज कंपन्यांना भारतात उद्योग सुरु करता येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.
चिनी स्मार्टफोन कंपन्यांसाठी कठोर भूमिका घेत सरकारने म्हटले आहे की, जर त्यांना त्यांचा कोणताही माल किंवा फोन भारतात विकायचा असेल तर त्यांनी आधी त्यांचा भारतीय भागीदार निवडला पाहिजे. भारतीय भागीदार जोडल्याशिवाय ते भारतात उत्पादन करू शकणार नाहीत.
स्थानिक भागीदारांची आवश्यकता
लोकसंख्येच्या बाबतीत आता भारताने चीनला देखील मागे टाकले आहे. भारतात मोठ्या प्रमाणात टेलिकम्युनिकेशन सुविधा वापरणारे लोक आहेत. मोबाईल फोन निर्मितीत चायना जगातील सर्वात मोठा उत्पादक देश असून त्या खालोखाल भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही चिनी कंपनीला आपला मोबाईल फोन किंवा काही भाग भारतात बनवायचे असतील तर कंपनीला सरकारच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की जर चिनी कंपन्यांना भारतात व्यवसाय करायचा असेल तर त्यांचे स्थानिक भागीदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), मुख्य ऑपरेशनल अधिकारी (COO), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) अशा पदांवर भारतीय नागरिक असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
झाओमीने याआधीच डेक्झोन टेक्नोलॉजी सोबत (Dexon Techonologies) स्मार्टफोन बनवण्यासाठी भागीदारी केली आहे. झाओमी त्यांचे ऑडीयो उत्पादने देखील येणाऱ्या काळात भारतातच बनवणार आहे, त्यासाठी त्यांनी ऑप्टीमस (Optimus) कंपनीशी भागीदारी केली आहे. Oppo ने भारतात ओप्पो मोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी सुरु केली असून, त्यात भारतीय नागरिक असलेल्या कर्मचाऱ्यांना महत्वाची पदे दिली आहेत. Coolpad ने व्हिडीयोकॉन कंपनीशी भागीदारी केली आहे.
कर चोरी करू नका
केंद्र सरकारने चीनी कंपन्यांना हे देखील सूचित केले आहे की देशांतर्गत व्यापार करताना कंपन्यांनी भारतीय वितरण व्यवस्थेचाच अवलंब करावा आणि देशातील कंपन्यांसाठी असलेल्या नियम-अटींचे पालन करावे. आयकर विभागाने घालून दिलेले नियम चीनी कंपन्यांना देखील फॉलो करणे गरजेचे असून त्यांनी वेळच्या वेळी आयकर भरावा आणि करचोरीचा प्रयत्न करू नये असे देखील म्हटले आहे.