Cheque Bounce Alert: वारंवार चेक बाऊन्स होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बँकांनी या संदर्भात कडक नियम केले आहेत. त्यामुळे चेक क्लिअर होईपर्यंत खात्यामध्ये पुरेशी रक्कम राहील, याची काळजी घ्या. अन्यथा, चेक बाऊन्स झाला तर तुम्हाला तुरूंगाची हवा खावी लागू शकते.
चेक बाऊन्स झाल्यामुळे 5 महिन्यांपूर्वी ठाणे जिल्हा न्यायालयाने एका व्यापाऱ्याला 3 महिन्यांची तुरूगांची शिक्षा सुनावली. तसेच बाऊन्स झालेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम देण्यास भाग पाडले होते. विशेष कारण नसताना चेक बाऊन्स झाला असेल तर तो गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे तुम्हीही कोणाला चेक दिला असेल तर तो बाऊन्स होणार नाही, याची काळजी घ्या.
चेक बाऊन्स होणे म्हणजे काय?
जेव्हा एखादी व्यक्ती चेकचा वापर करून बँक खात्यातून पैसे काढण्याचा किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करते. पण चेक दिलेल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे त्यातून पैसे काढता येत नाहीत किंवा ते ट्रान्सफर होऊ शकत नाही. तेव्हा या प्रक्रियेला चेक बाऊन्स होणे म्हणतात. चेक बाऊन्स होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण प्रामुख्याने खात्यात पुरेसे पैसे नसल्याने चेक बाऊन्स होतो.
चेक बाऊन्स झाला तर त्याविरोधात दाद मागता येऊ शकते. तसेच संबंधित व्यक्तीकडून दंडही वसूल केला जातो. बँक खात्यात पुरेसा निधी नसतानाही चेक दिल्यास तो Negotiable Instruments Act (NI Act) अंतर्गत कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला तुरूंगवासासह दंडही भरावा लागू शकतो. या चुकीच्या गोष्टीमुळे संबंधित खातेधारकाच्या सिबिल स्कोअरही विपरित परिणाम होऊ शकतो.
चेक बाऊन्स झाल्यावर दंड किती?
चेक बाऊन्स झाल्यावर बँक चेक देणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करते. कारण चेक भरल्यानंतर बँक दोन्ही खातेधारकांना या प्रक्रियेची माहिती देत असते. यासाठी बँकेचा वेळ खर्च होतो. त्यामुळे बँक अशा खातेदारांकडून दंडात्मक खर्च वसूल करते. याशिवाय चेक बाऊन्स झाल्यानंतर चेकवरील रक्कम महिन्याभरात देणे गरजेचे आहे. अन्यथा त्याला कायदेशीर नोटीस पाठवली जाते. या नोटीशीला ठराविक मुदतीत उत्तर न दिल्यास Negotiable Instruments Act (NI Act) मधील कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला जातो.
चेक बाऊन्स झाल्यावर बँका किमान शंभर रुपयांपासून दंड आकारतात. दंड आकारताना बँका चेकवरील रक्कम ग्राह्य धरून त्यानुसार जास्तीचा दंडही आकारतात.
दोन वर्षांचा तुरूंगवास
चेक बाऊन्स झाल्यानंतर तो कायद्याने सिद्ध झाल्यास संबधित खातेधारकाला जास्तीत जास्त 2 वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये कोर्ट दंड वसूल शिक्षा स्थगित करतात. तर काही प्रकरणांमध्ये दोन्ही प्रकारची शिक्षा सुनावली जाते.