संपूर्ण कुटुंबासाठी किंवा स्वत:साठी हेल्थ इन्शुरन्स घेताना अनेकवेळा तुमचा गोंधळ उडाला असेल. अचानक येणारा दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी आरोग्य विमा अत्यंत गरजेचा आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवण्यात येतात. अशी काही फिचर्स देऊ केली जातात, जी ग्राहकांच्या गरजेचेही नसतात. जास्त बेनिफिट असलेली एखादी पॉलिसी चांगली असेलच असे नाही. कारण, बऱ्याच वेळा ज्या बेनिफिटची जास्त गरज असते त्यापेक्षा इतर गोष्टींचे पॉलिसी घेताना जास्त मार्केटिंग केले जाते. मात्र, आरोग्य विमा काढताना तुमची गरज काय आहे? हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतरच तुम्ही आरोग्य विमा निवडायला हवा. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढताना या गोष्टी आधी पाहा...
किती रकमेचा कव्हर निवडावा -
कुटुंबासाठी आरोग्य विमा घेत असाल तर 3 लाखांच्यापुढे सहसा फ्लोटर विमा पॉलिसी मिळते. म्हणजे कुटुंबातील चार सदस्यांसाठी 3 लाख रुपयांचा एकूण विमा कव्हर मिळतो. ही रक्कम कदाचित कमी पडू शकते त्यामुळे यापेक्षा जास्त रकमेचा विमा पॉलिसी घेतलेले योग्य राहील. तसेच, कुटुंबियांची आरोग्याची स्थिती, जीवनपद्धती, आधीपासून असलेले आजार, वय यावरुन विम्याचा कव्हर किती घ्यावा हे ठरवावे. मोठ्या शहरांमध्ये रुग्णालयाचा खर्च जास्त येतो. याचाही विचार करावा.
रुम रेंटसाठी किती रक्कम मंजूर आहे
आरोग्य विमा काढताना विमा कंपनीकडून रुम रेंटसाठी काही रक्कम ठरवून दिलेली असते. तुम्ही रुग्णालयात भरती झाल्यानंतर जी खोली निवडता त्यासाठी वेगवेगळे भाडे असते. मात्र, जर विमा कंपनीने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची खोली तुम्ही घेतली तर अतिरिक्त रुम भाड्याचे पैसे कव्हर होणार नाहीत. बऱ्याच वेळा विम्याच्या एकूण कव्हच्या १ टक्के रक्कम रुम भाड्यासाठी असते. जर तुम्ही 3 लाखांचा कव्हर असणारी हेल्थ पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही प्रतिदीन 3 हजार रुपयापर्यंतची रुम घेवू शकता. त्यापेक्षा जास्त रेंट असेल तर त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. जर 5 लाखांचा कव्हर असेल ५ हजार रुपये प्रतिदिन भाडे कंपनीकडून मिळेल.
जर तुम्ही मेट्रो शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला ही रक्कम कमी पडू शकते. त्यामुळे तुम्ही अशी पॉलिसी निवडायला हवी ज्यामध्ये रुम भाड्यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे सिंगल AC रुम पॉलिसीच्या बेनिफिटमध्ये असेल तसेच त्यावर भाड्याची कोणतीही मर्यादा नसेल तर तुम्ही अशा पॉलिसीस प्राधान्य दिले पाहिजे. सहसा जास्त कव्हर असणाऱ्या पॉलिसींमध्ये हे फिचर असते.
सबलिमिट आहे का तपासून घ्या
बऱ्याच वेळा विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर मिळणारी कागदपत्रे आपण व्यवस्थित वाचत नाहीत. त्यामुळे ऐनवेळा मनस्ताप होतो. विमा कंपन्यांकडून काही आजारांच्या उपचारावर सबलिमिट लावण्यात येते. म्हणजे, जर तुम्ही 5 लाखांची विमा पॉलिसी खरेदी केली असेल तर हृदयरोगावरील उपचारासाठी त्यातील फक्त 2 लाख रुपये विमा कवच मिळेल, अशी अट कंपनीने घातलेली असते. पूर्ण पाच लाख रुपये त्यासाठी मिळणार नाही. अशा परिस्थितीत जर तुमचे बील जास्त झाले तर तुम्हाला खिशातून पैसे भरावे लागतील.
को-पेमेंट आणि डेकेअर सुविधा
विमा पॉलिसी घेताना कंपनीद्वारे को-पेमेंटचा क्लॉज लावण्यात येतो. जर 20 टक्के को-पेमेंटचा क्लॉज असेल तर तुम्हाला हॉस्पिटलच्या एकूण बिलाच्या 20 टक्के रक्कम भरावी लागेल तर 80 टक्के रक्कम विमा कंपनी भरेल. अशी पॉलिसी घेणे टाळा. कारण, यामुळे विमा काढण्याचा मुख्य उद्देश पूर्ण होत नाही. प्रिमियम भरुनही तुम्हाला बिलातील 20 टक्के रक्कम भरावी लागू शकते.
रुग्णालयात भरती न होता काही तासामध्ये ट्रिटमेंट होऊ शकते आणि संध्याकाळी तुम्ही घरीही याल, हा खर्च तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर होतो की नाही हे तपासून घ्या. यास डे केअर ट्रिटमेंट म्हणतात. कारण रुग्णालयात भरती झाल्यानंतर विमा क्लेम करता येतो. मात्र, अॅडमिट न होता कोणत्या ट्रिटमेंटचा विम्यात समावेश आहे ते पाहून घ्या. जर डे केअर ट्रिटमेंटचा पर्याय नसेल तर तुम्ही दुसरी पॉलिसी पाहू शकता.
यासोबतही इतर अनेक गोष्टी विमा पॉलिसी घेताना महत्त्वाच्या असतात. त्या बारकाईने पाहूनच तुम्ही पॉलिसी खरेदी करायला हवी.