Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Refrigerator Maintenance: फ्रिजच्या वापरामुळे वीजबिल वाढलंय? फॉलो करा या टिप्स, मेंटेनन्सचा खर्चही वाचेल!

Refrigerator Maintenance

एसी प्रमाणेच फ्रीजची सर्व्हिसिंग देखील महागडी असते, सर्व्हिसिंगचा खर्च आणि तुमच्या वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी तुमच्या रेफ्रिजरेटरची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घरच्या घरी काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरची कार्यक्षमता वाढवू शकता. जाणून घेऊयात यासाठीच्या काही टिप्स.

आजकाल प्रत्येक घरात फ्रीज आहे. उन्हाळ्यात तर फ्रीजचा वापर आणखी वाढत असतो. फ्रीजचा वाढता वापर म्हणजेच फ्रीजसाठी विजेचा अधिक वापर. आता विजेचा अधिक वापर केला म्हणजे वीजबिलात वाढ होणार हे काही वेगळे सांगायला नको. परंतु काही साध्यासोप्या टिप्स फॉलो केल्या तर आपले वीजबिल देखील कमी येईल आणि फ्रीजची वेळोवेळी दुरुस्ती करण्यासाठी लागणारा खर्च देखील कमी होऊ शकतो.

एक तर एसी प्रमाणेच फ्रीजची सर्व्हिसिंग देखील महागडी असते, सर्व्हिसिंगचा खर्च आणि तुमच्या वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी तुमच्या रेफ्रिजरेटरची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घरच्या घरी काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरची कार्यक्षमता वाढवू शकता. जाणून घेऊयात यासाठीच्या काही टिप्स.

तापमान सेटिंग (Proper Temperature Settings) 

तुमच्या रेफ्रिजरेटरचे तापमान कंपनीने शिफारस केलेल्या स्तरावरच सेट करा, विशेषत: 35 ते 38 अंश फॅरेनहाइट म्हणजेच 2 ते 3 अंश सेल्सिअस दरम्यान तुमच्या फ्रीजचे तापमान ठेवल्यास विजेची बचत होईल. तसेच फ्रीझरचे तापमान सुमारे 0 डिग्री फॅरेनहाइट (-18 अंश सेल्सिअस) इतके असावे. या तापमान सेटिंग केल्यास विजेचे युनिट कमी खर्च होतीलच परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले तुमचे खाद्यान्न देखील लवकर खराब होणार नाही.

कॉइल्सची सफाई (Clean the Coils)

रेफ्रिजरेटरच्या मागील बाजूस कंडेन्सर कॉइल्स असतात, फ्रीजमधील तापमान कमी ठेवण्यात या कॉइल्सची महत्वाची भूमिका असते. या कॉइल्स वेळोवेळी साफ केल्या पाहिजेत. आपले फ्रीज बऱ्याचदा भिंतीला खेटून असतात, त्यामुळे फ्रीजच्या मागच्या भागात फार कमी वेळा सफाई केली जाते. कॉइल्सवर धूळ किंवा इतर घाण जमा झाल्यास त्याचा थेट परिणाम फ्रिजच्या कार्यक्षमतेवर होतो हे लक्षात असू द्या.

फ्रीजच्या दरवाजाची काळजी (Check the Fridge Door)

आपल्याकडे बहुतेकवेळा फ्रीजचा दरवाजा प्रेमाने बंद केले जात नाहीत. धूमधडाम पद्धतीने फ्रीजचा दरवाजा उघडला आणि बंद केला जातो. कालांतराने फ्रीजच्या दरवाजाचे सील खराब होते आणि त्यातून रेफ्रीजरंटची (ज्यामुळे फ्रीज थंड राहते असे वायू) गळती होते आणि कुलिंग होणे बंद होते. हे जर टाळायचे असेल तर दरवाजाचे सील वेळोवेळी चेक करत राहा, तसेच खराब झाल्यास वेळेत ते बदलून घ्या.

सामानाची गर्दी नको (Avoid Overloading)

 फ्रीज म्हणजे स्टोरेज नाही हे लक्षात असू द्या. खाद्यान्न सुरक्षित आणि खाण्याजोगे राहावे म्हणून फ्रीजचा वापर केला जातो. आपल्याकडे मात्र आठवडाभराचा बाजार, किराण्याचं सामान, पाण्याच्या बाटल्या, शिळी भाजी, कापलेले लिंबू, कांदे अशा वाट्टेल त्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. यामुळे  रेफ्रिजरेटरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. फ्रीजमध्ये जितकी कमी जागा तितकी थंड हवा खेळती राहायला मदत होते. फ्रीजवरचा भार कमी करायचा असेल तर फ्रीजमध्ये सामानाची गर्दी नको. ज्या खाद्यान्नाला कुलिंगची गरज आहे असेच पदार्थ त्यात ठेवा.

नियमितपणे डीफ्रॉस्ट करा Defrost Regularly

जर तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये मॅन्युअल डीफ्रॉस्ट करायचा ऑप्शन असेल तर वेळोवेळी फ्रीजरमध्ये जमा झालेला बर्फ काढून टाका. हा बर्फ काढताना फ्रीजचे तापमान कमी करा, उगाच छन्नी हातोडा घेऊन बर्फ काढण्याचा प्रयत्न करू नका! बेच लोक सुरीने किंवा टोकदार वस्तूने बर्फ काढायचा प्रयत्न करतात. यात अनेकदा फ्रीजच्या कॉइल्सचे नुकसान होते. त्यातून रेफ्रीजरंटची गळती होऊन फ्रीज काम करणे बंद होते. रेफ्रीजरंटचा खर्च साधारण फ्रीजसाठी कमीत कमी 4000 इतका आहे. त्यामुळे फ्रीज डीफ्रॉस्ट करताना विशेष काळजी घ्या.

नियमित स्वच्छता ठेवा  (Organize and Clean) 

फ्रीजमध्ये आपण खाद्यान्न ठेवत असतो. अनेकदा दुध, कालवण, मसाले फ्रीजमध्ये ठेवताना अथवा काढताना सांडतात. लगेचच्या लगेच ते साफ करण्याचा आपल्याला कंटाळा आलेला असतो, नंतर साफ करू असं म्हणत आपण फ्रीज तसाच बंद करतो. थोड्या कालावधीनंतर संपूर्ण फ्रीजमध्ये सांडलेल्या पदार्थाचा वास यायला लागतो, हेच नाही तर फ्रीजमधील इतर पदार्थ खाताना देखील आपल्याला वास येतो. असे अनुभव आपल्याला कधी न कधी आले असतील. अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी फ्रीज नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामुळे अन्नाची बचत तर होईलच परंतु फ्रीजची कार्यक्षमता आणि कुलिंग करण्याची क्षमता वाढेल.

उष्णतेपासून दूर ठेवा ( Avoid Heat Sources)

तुमचे रेफ्रिजरेटर थेट सूर्यप्रकाशापासून दूर राहील याची काळजी घ्या. आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात फ्रीजची जागा ही किचनमध्ये असते. स्वयंपाकाच्या शेगडी आणि फ्रीजमध्ये पुरेसे अंतर असणे गरजेचे आहे. ओव्हन किंवा इतर उष्णता उत्सर्जित करणाऱ्या उपकरणांपासून फ्रीज दूर ठेवणे कधीही चांगले.

अधिक उष्णता रेफ्रिजरेटरला कुलिंग राखण्यासाठी अडचणीची ठरते. त्यामुळे विजेचा वापर देखील वाढतो हे लक्षात असू द्या.

खेळती हवा राहू द्या ( Allow Air Circulation)

हवा खेळती राहावी यासाठी रेफ्रिजरेटरभोवती पुरेशी जागा असल्याची खात्री करा. फ्रीज आणि भिंत किंवा कॅबिनेटमध्ये किमान 2-3 इंच (5-7.5 सेमी) अंतर असायला हवे.  रेफ्रिजरेटरद्वारे निर्माण होणारी उष्णता प्रभावीपणे विसर्जित करण्यासाठी पुरेशी जागा गरजेची आहे. नाही तर फ्रीज वारंवार बंद पडण्याची शक्यता असते.

या टिप्स जर तुम्ही रोजच्या रोज फॉलो करत असाल तर सहाजिकच तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरची कार्यक्षमता वाढवू शकता तसेच सर्व्हिसिंगची गरज देखील कमी करू शकता. असे केल्यास तुमचे लाईट बिल तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता हे विसरू नका. सोबतच फ्रीज निर्मात्या कंपनीकडून दिले गेलेले मॅन्युअल लक्षपूर्वक वाचा. कंपनीने दिलेला सल्ला देखील विचारात घ्या, तुमचा फायदाच होईल.