Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Honeymoon Budgeting: कुठं कुठं जायाचं हनिमूनला? बजेटनुसार ठरवा लोणावळा, खंडाळा , थायलंड की मालदीव…

Honeymoon Budgeting

या लेखात जाणून घ्या काही साध्यासोप्या टिप्स ज्या तुमच्या हनिमूनचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतात. तसेच वैवाहिक जीवनाला सुरुवात करताना आर्थिक ताण न घेता जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण देखील आनंदाने साजरे करू शकता.

सध्या लग्नाचा सिजन सुरु आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्याचा ट्रेंड आता भारतीय कुटुंबात देखील रुळला आहे. अनेक जोडपी लग्नाच्या आधीपासूनच हनिमूनला कुठे जायचं? कधी जायचं? कसं जायचं? याचं सविस्तर नियोजन करत असतात, त्यामुळे ऐनवेळी कुठली गडबड होत नाही. एक तर लग्नाचा खर्च अतो भरमसाठ, त्यात लग्नानंतर रिसेप्शन, पूजा-अर्चा यांच्या खर्चाचा देखील विचार करावा लागतो. या सगळ्यात जर तुम्ही हनिमूनच्या खर्चासाठी एक वेगळ बजेट जर आखत असाल तर त्यासाठी विचारपूर्वक आर्थिक नियोजन गरजेचं आहे हे लक्षात घ्या.

या लेखात आपण जाणून घेणार आहोत अशाच काही साध्यासोप्या टिप्स ज्या तुमच्या हनिमूनचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतात. तसेच वैवाहिक जीवनाला सुरुवात करताना जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण देखील आनंदाने साजरे करू शकता.

अंथरून पाहून पाय पसारा!

होय, हा सल्ला एकदम थेट असला तरी तो तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. लग्नकार्य संपलं म्हणजे सगळे खर्च संपले असं होत नाही. लग्नानंतर कुणाची उरली सुरली देणी देखील द्यायची राहिली असतील तर त्याचा आधी हिशोब ठेवा. पाहुण्या-रावळ्यांना काय कमी-जास्त हवं हे लग्नानंतर देखील आपल्याला बघावं लागतं. ऐनवेळी पंचायत नको म्हणून लग्नानंतरच्या कार्यक्रमांसाठी एक वेगळ बजेट तयार करा. अर्थात त्यात हनिमूनचा खर्च पकडू नका. हनिमूनसाठी एक स्वतंत्र बजेट तयार करा. लग्नाचा आणि लग्नानंतरचा खर्च लक्षात घेऊनच हनिमूनचे बजेट ठरवावे लागेल हे काही वेगळ सांगायला नको.

ऑफ-सीझन ट्रॅव्हल ठरेल फायद्याचा 

तुम्ही तुमच्या हनीमूनवर किती  खर्च करू शकता हे आधीच ठरवून प्लॅनिंगला सुरुवात करा. तुमच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि त्यानुसार जे ठिकाण तुम्ही निवडलं आहे तेथील राहण्याची, जेवणाची, फिरण्याची आणि इतर गोष्टींसाठी विशिष्ट रक्कम ठरवा.  

हे सर्व करताना जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर ऑफ-सीझन किंवा मिड-वीक ट्रॅव्हल हा पर्याय निवडा. लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये नॉन-पीक (Non Peak) कालावधी  दरम्यान सवलतीचे दरात सर्व सोयीसुविधा मिळतील. त्यात तुमचे तिकिटाचे (विमान, बस, ट्रेन आदी) पैसे, हॉटेलिंगचे, खाण्यापिण्याचे पैसे  हमखास वाचणार आहेत. तसेच गर्दी नसल्यामुळे जोडीदारासोबत विनाव्यत्यय वेळ देखील  घालवता येईल.

हनिमून रजिस्ट्री 

सध्या हा एक नवा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. नवरा-नवरीला हंडा,कळशी, फ्रीज, सोफा, बेड भेट म्हणून देण्याची पद्धत आता लुप्त होते आहे. विवाहित दांपत्य आधीपासूनच सेटल असेल तर अशा गोष्टींचा त्यांना उपयोग नसतो. अशावेळी तुम्ही  हनिमून रजिस्ट्री सेट करण्याचा विचार करू शकता. म्हणजेच तुमच्या हनिमूनच्या खर्चासाठी तुम्ही तुमच्या मित्रांकडून, पाहुण्यांकडून गिफ्ट मागू शकता. यात विमानाची तिकिटे, हॉटेल्सचा खर्च, रोख रक्कम या गोष्टींचा सामावेश होतो. आपल्या मित्रांना हनिमून पॅकेज गिफ्ट करण्याचा ट्रेंड भारतात देखील सुरु झालाय.

बजेट-फ्रेंडली ठिकाणे निवडा 

हनिमूनसाठी तुम्ही भारतातील किंवा भारताबाहेरील ठिकाणे निवडत असाल तर त्याचा खर्च आपल्या आवाक्यात आहे का हे बघा. परदेशात जायचा तुम्ही विचार करत असाल तर निश्चितच त्यासाठी तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. यावर मार्ग म्हणून काही कपल्स लग्नानंतर देशांतर्गतच हनिमूनसाठी जातात आणि 6-7 महिन्यांनंतर जोडीदाराच्या वाढदिवसाचे निमित्त वा इतर औचित्य बघून विशिष्ट बजेटसह परदेशात हनिमूनला जायचा प्लॅन बनवतात.

इंटरनेटवर एका क्लिकवर तुम्हाला पर्यटन स्थळांची माहिती मिळते. हनिमूनसाठी ठिकाण ठरवत असताना इंटरनेटवर त्या ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती घ्या. ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल वेबसाइट आणि बजेट एअरलाइन्ससह विविध ठिकाणी स्वस्तात कुठे सुविधा मिळू शकते याची चाचपणी करा . तुमच्या बजेटला अनुरूप अशा ऑफर्स आणि पॅकेज बघा. लवकरात लवकर बुकिंग केल्यास तुम्हाला स्वस्तात प्रवास, हॉटेल आणि इतर गोष्टी अनुभवता येणार आहेत हे लक्षात असू द्या.

स्ट्रीट फूड आणि बजेट हॉटेल्सचा अनुभव 

हनिमूनला जाताना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता यावा यासाठी जात असता. तेव्हा उगाच महागड्या हॉटेल्समध्ये जावून मोठंमोठी बिलं भरण्यापेक्षा परवडणाऱ्या किमतीत त्या प्रदेशातील अस्सल पाककृती अनुभवण्यासाठी स्थानिक हॉटेल्स आणि स्ट्रीट फूड स्टॉल्स एक्सप्लोर करा. तसेच होमस्टे आणि बजेट हॉटेल्सचा  विचार करा. लक्झरी रिसॉर्ट्स किंवा हाय-एंड हॉटेल्सच्या तुलनेत कमी किमतीत आरामदायी अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो.

शॉपिंग टाळाच!

तुम्ही हनिमूनला जात आहात, कुठल्या सुपरशॉपीमध्ये नाही. तेव्हा कुटुंबियांना, मित्र मंडळींना महागडे गिफ्ट्स, खाण्याचे पदार्थ आणण्याचा मोह टाळा. अनावश्यक खरेदी टाळली तर तुमच्या खूप साऱ्या पैशांची बचत होऊ शकते हे लक्षात घ्या.

या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्ही तुमच्या हनिमूनसाठी एक उत्तम बजेट बनवू शकता आणि पैशाची बचत देखील करू शकता. एकदा की पैशाचा अंदाज आला की लोणावळा, खंडाळा , थायलंड, मालदीव अशी ठिकाणे तुम्हाला निवडणे सोपे जाईल आणि जास्त खर्च न करता एक संस्मरणीय आणि रोमँटिक हनीमून साजरा करू शकता.