cheapest Home Loan offer: घरांच्या वाढत्या किंमती पाहता नवं घर घेताना कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सहसा कर्जाची रक्कम 20, 30 लाखांच्या पुढेच असते. अशा वेळी होम लोनचा व्याजदर काही पॉइंटने जरी कमी असेल तर लाखोंमध्ये व्याज वाचू शकते. तसेच इएमआयही कमी येईल. घर घेण्याआधी ग्राहक कमीत कमी व्याजदर देणाऱ्या बँकेच्या शोधात असतात.
कोणतीही बँक तुम्हाला तुमचे सिबिल स्कोअर, आधीचे कर्ज, उत्पन्न, नोकरी/ व्यवसाय, तुमच्यावरील जबाबदाऱ्या, बँकेसोबतचे संबंध, कुटुंबाचे उत्पन्न पाहून कर्ज देते, तसेच व्याजदर आकारते.
व्हेरिएबल आणि फिक्स व्याजदर
होम लोन घेताना व्हेरिएबल म्हणजेच बदलता किंवा निश्चित (फिक्स्ड) व्याजदर बँक आकारते. फिक्स व्याजदर असेल तर संपूर्ण परतफेड कालावधीत व्याजदर तेवढाच राहील. त्यात वाढ होणार नाही. मात्र, जर बदलता (व्हेरिएबल) व्याजदर असेल तर आरबीआयच्या रेपो रेट नुसार व्याजदर कमी-जास्त होईल. सहसा फिक्स्ड होम लोनचा व्याजदर व्हेरिएबलपेक्षा जास्त असतो.
लोन घेताना शुल्क
होम लोन देताना बँक वन टाइम प्रोसेसिंग फी आकारते. हे कर्जदाराला वेगळे भरावे लागतात. कर्जाच्या रकमेतून वजा केले जात नाहीत. काही बँका ग्राहकांना प्रोसेसिंग शुल्कावर सूट देतात. सोबतच इतर काही गोष्टींसाठी शुल्क असते. जसे की, डॉक्युमेंट तपासणी फी, ब्युरो रिपोर्ट चार्ज, आयटीआर व्हेरिफिकेशन शुल्क, CERSAI शुल्क यासाठी कर्जदाराला वेगळे पैसे द्यावे लागतात.
कर्ज मुदतीच्या आधीच फेडता येते का?
गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्ही कर्ज कालावधीच्या आधीही संपूर्ण रक्कम चुकची करू शकता. मात्र, बँक कर्जाच्या उर्वरित रकमेवर 2 ते 3% दंड आकारते. तुम्ही दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊन प्रिपेमेंट करत असाल तर बँक जास्त शुल्क आकारते. मात्र, जर तुम्ही स्वत:च्या उत्पन्नातून कर्ज फेड करत असाल तर शुल्क थोडे कमी असू शकते.