उत्तराखंडमधील केदारनाथ धाम भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. महाशिवरात्रीला, शनिवारी उखीमठ येथे पारंपारिक पूजेनंतर पंचांगानुसार केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता मंदिराचे दरवाजे उघडतील असे मंदिर प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,केदारनाथ मंदिराचे दरवाजे 25 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता उघडणार आहेत. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथ दरबारात भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी केल्या जाणार्या परंपरा आणि विधी चार दिवस अगोदर म्हणजेच 21 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 21 एप्रिल रोजी हिवाळी सिंहासन असलेल्या उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून केदारनाथसाठी डोली निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबा केदार यांची डोली यात्रा 24 एप्रिलला केदारनाथ येथे पोहोचेल. ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथून पायी चालत केदारनाथला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी धार्मिक विधी सुरू होईल. धार्मिक विधीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे सकाळी 6.20 वाजता उघडतील.
मागीलवर्षी 27 ऑक्टोबर रोजी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथ मंदिराचे दरवाजे मंत्रोच्चारात बंद करण्यात आले होते. लष्कराच्या मराठा रेजिमेंटच्या बँडने भक्तिगीत सादर करत या विधीला हजेरी लावली होती. केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर ही डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिराकडे रवाना करण्यात आली होती. 29 ऑक्टोबर रोजी ओंकारेश्वर मंदिराच्या हिवाळी पूजेच्या आसनावर ही डोली बसवण्यात आली होती.
आता मात्र महाशिवरात्री (18 फेब्रुवारी) रोजी उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख घोषित करण्यात आली आहे. केदारनाथ रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडपासून सुमारे 16 किमी अंतरावर आहे. केदारनाथ मंदिर 25 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यानंतर 27 एप्रिल रोजी सकाळी 7.10 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील.
श्री बद्री-केदार मंदिर समितीचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वरम मंदिरात २० एप्रिल रोजी भैरवनाथजींची पूजा केली जाणार आहे. यानंतर 21 एप्रिल रोजी भगवान केदारनाथच्या पंचमुखी डोलीची यात्रा केदारनाथसाठी सुरू होईल. या दिवशी गुप्तकाशीच्या विश्वनाथ मंदिरात देवाची डोली रात्रीचा विसावा घेईल. ही डोली 22 एप्रिलला फाटा येथे, 23 एप्रिलला गौरीकुंड येथे आणि 24 एप्रिलला केदारनाथ धामला पोहोचेल.त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाचे मंदिर उघडले जाईल.
Table of contents [Show]
हिवाळ्यात बंद असते चारधाम मंदिर
बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे हिवाळ्यात भक्तांसाठी बंद असतात कारण प्रचंड थंडी, बर्फवृष्टी, हवामान मानवांसाठी प्रतिकूल असते. दरवर्षी उन्हाळ्यात या चारही मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात आणि हिवाळा सुरू होईपर्यंत खुले राहतात.
केदारनाथ धामशी संबंधित खास गोष्टी
केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे आणि उत्तराखंडच्या चार धामांपैकी तिसरे प्रमुख तीर्थस्थान आहे. असे मानले जाते की येथे भगवान शिव पांडवांना बैलाच्या रूपात येथे प्रकट झाले होते. त्यानंतर आदिगुरू शंकराचार्यांनी हे मंदिर याठिकाणी बांधले अशी आख्यायिका आहे. केदारनाथ हे 3,581 चौरस मीटर उंचीवर आहे. स्कंद पुराणानुसार गढवालला ‘केदारखंड’ म्हटले गेले आहे. बद्रीनाथ मंदिराचे वर्णन स्कंद पुराण आणि विष्णु पुराणातही आढळते.
केदारनाथ धामला कसे पोहोचाल?
केदारनाथला विमानाने यायचे असेल तर जवळचे विमानतळ डेहराडूनमधील ‘ग्रँट जॉली’ हे आहे. जर तुम्हाला रेल्वेने यायचे असेल तर जवळची रेल्वे स्टेशन ऋषिकेश, हरिद्वार आणि डेहराडून ही आहेत. या तिन्ही शहरांमधून केदारनाथला जाण्यासाठी बसेस किंवा टॅक्सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. या रस्ता प्रवासात आधी सोनप्रयाग गाठावे लागते, नंतर गौरीकुंड गाठावे लागते. केदारनाथ येथून 16 किमी अंतरावर आहे. यात्रेसाठी देश-विदेशातून लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे. हा प्रवास सोपा व्हावा यासाठी उत्तराखंड सरकारनेही कसरत अधिक तीव्र केली आहे. 21 फेब्रुवारीपासून यात्रेसाठी नोंदणी सुरू होणार असून, नोंदणीशिवाय कोणत्याही भाविकाला यात्रेत सहभागी होता येणार नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यात्रेसाठी नोंदणीची अधिकृतपणे ही तारीख जाहीर केली आहे.
केदारनाथ यात्रा 25 अप्रैल से शुरू, घोड़ों और खच्चरों की निगरानी के लिए विशेष जवान तैनात#latestnews #kedarnath #uttarkhandnews pic.twitter.com/yYePLKjWmY
— Bharat Aaj (@BharatAaj247) February 20, 2023
अशी कराल यात्रेसाठी नोंदणी
चारधाम यात्रेत सहभागी होण्यासाठी भाविक उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. ही नोंदणी 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चारधाम यात्रेसाठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला वेबसाइटवर जाऊन नोंदणी/लॉग इन बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर, एक नवीन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रवासाशी संबंधित माहिती द्यावी लागेल. सर्व तपशील भरल्यानंतर, तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्हाला एसएमएसद्वारे एक नोंदणी क्रमांक पाठवला जाईल. यासोबतच तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता. संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्हाला हा नोंदणी फॉर्म तुमच्यासोबत ठेवावा लागेल. यासोबतच तुम्हाला तुमचे एक ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. गेल्या वर्षी 45 लाखांहून अधिक भाविकांनी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री आणि हेमकुंड साहिबला भेट दिली होती. यंदा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात्रेकरूंची होणारी गर्दी पाहता शासनाने यात्रेसाठी ठोस व्यवस्था सुरू केली आहे.