राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दिमाखदार सोहळ्यात सेंट्रल व्हिस्टा ही नव्या संसदेची इमारतीचे लोकार्पण होईल. मागील चार वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. जुनी इमारत अपुरी पडत असल्याने नवे संसद भवन बांधण्यात आले आहे. हे संसद भवन बांधण्यास किती खर्च आला यामध्ये खास काय आहे जाणून घेऊया.
सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट
डिसेंबर 2020 साली या संसद निर्माण प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. तेव्हा अंदाजित खर्च 977 कोटी इतका होता. मात्र, एक वर्षानंतर त्यामध्ये 282 कोटींच्या अतिरिक्त खर्चाची भर पडली. ही रक्कम एकूण बजेटच्या 29% इतकी जास्त होती. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च 1,289 कोटींच्या दरम्यान झाल्याची माहिती आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. इमारतीचा संपूर्ण एरिया 98,000 sqm इतका असून अनेक अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवी इमारत असेल.
संसदेच्या नवीन लोकसभा गृहामध्ये 888 सदस्य बसण्याची सुविधा आहे तर संयुक्त अधिवेशनाच्यावेळी 1,224 सदस्य एकत्र बसू शकतात. राज्यसभा गृहात 384 सदस्य बसण्याची सुविधा आहे. या नव्या इमारतीवर देशाचा गौरवशाली वारसा दाखवण्यासाठी शिल्पे कोरण्यात आली आहेत.
प्रकल्पाचे कंत्राट कोणाला?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प उभारणीची कंत्राटे अनेक कंपन्यांना देण्यात आली आहेत. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे टाटा. टाटा प्रोजेक्ट्सद्वारे 40% प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. तसेच शापूरजी पालनजी ग्रूप, एल अँड टी या आघाडीच्या इफ्रास्ट्रक्चर कंपन्यांना संसदेची नवी इमारत, कार्यालये आणि परिसरातील निवासी इमारती उभारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
संसद परिसरातील इतर बांधकाम उभारणीसाठी खर्च किती?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत अनिवासी इमारती उभारण्यासाठी आणखी 2 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद 2022-23 अर्थसंकल्पात केली होती. त्याअंतर्गत विविध सचिवालये, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, सेंट्रल व्हिस्टा अॅवेन्यू उभारण्यात येत आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतच्या 3 किलोमीटर परिसराचाही पुन्हा विकास करण्यात येणार आहे.