जागतिक बाजारातील सोन्याची मागणीने पुन्हा एकदा कोविडपूर्वीची पातळी गाठली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये सोन्याची मागणी 28% ने वाढली आहे.आकडेवारीनुसार 30 सप्टेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत वर्ल्ड मार्केटमध्ये 1,181 टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली.सोन्याच्या एकूण मागणीत सेंट्रल बँकांनी मोठा ग्राहक म्हणून भूमिका बजावली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार जागतिक स्तरावरील सेंट्रल बँकांनी सप्टेंबरच्या तिमाहीत तब्बल 2 लाख किलो सोनं ( 400 टन) खरेदी केले आहे. तुर्की, उझबेकिस्तान,कतार या देशांच्या सेंट्रल बँकांनी सोने खरेदीत मोठा वाटा उचलला. यातून बँकांचा नेट पर्चेस 673 टन इतका वाढला आहे. 1967 नंतरचा हा सर्वाधिक आकडा असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटल आहे.
सेंट्रल बँकांनी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 400 टन सोनं खरेदी केले. मागील 22 वर्षात कोणत्याही तिमाहीत बँकांनी सोन्याची केलेली ही सर्वाधिक खरेदी असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटलं आहे. 2018 मध्ये तिसऱ्या तिमाहीत सेंट्रल बँकांनी 241 टन सोने खरेदी केले होते.जागतिक स्तरावर सलग आठव्या तिमाहीत बँकांनी सोने खरेदीचा सपाटा कायम ठेवला आहे. या आठ तिमाहींमधील एकूण सोने खरेदी 673 टनांवर गेली आहे.
तुक्री सेंट्रल बँकेने तिसऱ्या तिमाहीत 31 टन सोनं खरेदी केले आहे. तुर्की सेंट्रल बँक ही तिसऱ्या तिमाहीतील सोने खरेदी करणारी मोठी बँक ठरली आहे. या खरेदीने तुर्की सेंट्रल बँकेचा सोन्याचा साठा 489 टन इतका वाढला आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्ह अमेरिकेतील महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा धडाका लावला आहे. यामुळे कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढला आहे. मागील काही महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती.
भविष्यातील संकटाची चाहूल लागल्याने सेंट्रल बँकांचा सोने खरेदीवर भर
रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेसह युरोपातील बहुतांश देशांत उडालेला महागाईचा भडका, डॉलरसमोर इतर चलनांचे होणारे अवमूल्यन आणि चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक अशा घटनांमुळे महामंदी केव्हा येईल या भीतीने जगभरातील सेंट्रल बँकांची गाळण उडाली आहे. भविष्यातील संकटाची चाहूल लागल्याने सेंट्रल बँकांनी संकटकाळात कामी येणाऱ्या सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार जागतिक स्तरावरील सेंट्रल बँकांनी सप्टेंबरच्या तिमाहीत तब्बल 2 लाख किलो सोनं खरेदी केले आहे.
बड्या बँकांकडून सोने खरेदीची आकडेवारी लपवली जाते
वर्ल्ड गौल्ड कौन्सिलने सेंट्रल बँकांच्या सोने खरेदीबाबत शंका उपस्थित केली आहे. सोने खरेदीची तपशीलवार माहित बँकांकडून सादर केली जात नाही.बहुतांशवेळा खरेदीची आकडेवारी प्रत्यक्ष खरेदीच्या तुलनेत कमी दाखवली जाते (Underreported buying) असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चीन, रशिया या देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी आणि सोन्याचा साठा याबाबत कधीच आकडेवारी सार्वजनिकपणे जाहीर केली नसल्याचे दिसून आले आहे.
रिझर्व्ह बँकेकडे एकूण 785 टन सोन्याचा साठा
भारताची केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने तिसऱ्या तिमाहीत 17 टन सोने खरेदी केले आहे. आरबीआयने जुलै महिन्यात 13 टन आणि सप्टेंबर महिन्यात 4 टन सोन्याची खरेदी केली. आरबीआयने दिर्घकालीन धोरणानुसार सोने खरेदी सुरुच ठेवली असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटलं आहे. आरबीआयकडील सोन्याचा साठा सप्टेंबर अखेर 785 टन इतका आहे.