दोन हजाराच्या नोटबंदीनंतर घरात किती रोख रक्कम ठेवावी? याबाबत पुन्हा एकदा सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या प्रकारे सोने जवळ बाळगण्याबाबत मर्यादा आहेत तशीच रोख रक्कम घरात ठेवण्याबाबत मर्यादा आहे का? घरातील रोख रक्कम कुठून आली किंवा तिचा स्त्रोत काय हे सांगता आले नाही तर कारवाई होते का? याबाबत काय आहे नियमावली ते जाणून घेऊया. (Cash Limit For Home)
अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यावर आयकर विभागाने धाड टाकली. शेकडो-हजारो कोटींची रोकड जप्त केली अशा बातम्या सर्रास दिसून येतात. काहींजणांकडे बेहिशेबी रोकड मोजण्यासाठी तपास यंत्रणांना मशिनचा वापर करावा लागतो. हजारो कोटी घरात किंवा कार्यालयात दडवले जातात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगता येते का हा प्रश्न निर्माण होतो.
वर्ष 2016 मध्ये चलनी नोटांच्या माध्यमातून दडवलेला बेहिशेबी काळा पैसा नष्ट करण्यासाठी सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा रद्द केल्या होत्या.त्याऐवजी 2000 रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र गेल्याच महिन्यात 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा घरात किती कॅश ठेवावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्यक्षात आयकर विभागाचा घरात रोख रक्कम किती बाळगावी, असा कुठलाही नियम नाही. तुमची आर्थिक क्षमता, उत्पन्नाचे स्त्रोत यानुसार तुम्ही कितीही रोख रक्कम घरात ठेवू शकता. मात्र जेव्हा केव्हा तपासणी होईल तेव्हा रोख रक्कम कुठून आणली किंवा तिचा मूळ स्त्रोत काय याची समाधानकारक उत्तरे देता येणे आवश्यक आहे. तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर घाबरण्याची आवश्यकता नाही.
कोरोना काळात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले होते. मात्र आता पुन्हा रोख व्यवहार वाढले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे घरात रोकडचे प्रमाण वाढत आहे. तूर्त आयकर विभाग किंवा प्रत्यक्ष कर मंडळाकडून घरात किती रोख रक्कम ठेवावी याबाबत नियमावली नाही. मात्र बँकांसोबत रोखीसंदर्भात व्यवहार करताना मर्यादा आहे. एकावेळी 50000 रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास त्या व्यक्तीला पॅनकार्ड सादर करणे बंधनकारक आहे. एक वर्षात एखादी व्यक्ती बँक खात्यात 20 लाख रुपयांची रोकड जमा करु शकते किंवा बँक खात्यातून काढू शकते. दोन लाख रुपयांच्या कॅश पेमेंटवर पॅनकार्ड आणि आधार कार्ड सादर करावे लागते.
बेहिशेबी रोख रकमेवर लागेल प्रचंड कर ( Heavy Tax On Undisclosed Cash)
दरम्यान, तुमच्या घरात बेहिशेबी रोकड मिळाली तर त्यावर तुम्हाला जबर कर भरावा लागतो. आयकर विभागाने याबाबत दंडाची तरतूद केली आहे. 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर आयकर विभागाने बेहिशेबी रोकडबाबत कडक नियमावली केली आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या घरी बेहिशेबी रोकड आढळून आली तर त्या रकमेवर 137% कर वसूल केला जातो.