Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Caravan Trip: भारतीय पर्यटनातील पुढचे पाऊल, कारवॅनमधून घरासारखी ट्रीप एन्जॉय करा!

Caravan Trip

Image Source : www.theindia.co.in

Caravan Trip: ज्यांना घरामध्ये राहायला आवडते पण बाहेरच्या विश्वाचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे; त्यांच्यासाठी कारवॅन योग्य पर्याय आहे. कारवॅन किंवा कॅम्पर व्हॅन प्रवाशांना सुरक्षित प्रवास देतात.

कारवॅन ट्रीप (Caravan Trip) हा भारतातील पर्यटनाचा नवीन ट्रेंड आहे. झपाट्याने बदलत असलेल्या भारतीय प्रवासी उद्योगाच्या गतिशीलतेसह सुरक्षेची काळजी घेऊन कौटुंबिक प्रवासातील अडथळे टाळण्यासाठी जलद प्रवासाचा सोयीस्कर पर्याय म्हणून कारवॅनला पसंती मिळत आहे. कारवॅन हा शब्द पर्शियन कारवान मधून आला आहे; ज्याचा अर्थ "वाळवंटातील प्रवाशांचा गट" असा होतो. एका लांब रांगेत एकत्र प्रवास करणार्‍या लोकांच्या  मोठा गटाला कारवान म्हटले जाते. ज्यात राहण्याची जागा असते. अशाप्रकारे प्रवास करणाऱ्या गाडीला सुद्धा कारवॅन असे म्हणतात. पूर्वीच्या काळी, यात्रेकरू अनेकदा प्रवास करत असत, त्यांचे सर्व सामान त्यांच्यासोबत किंवा झाकलेल्या घोडागाड्यांमध्ये घेऊन जात असत. तेव्हापासून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असलेल्या आणि झाकलेल्या वाहनाला कारवॅन Caravan) हा शब्द वापरला जाऊ लागला.

अनेक राज्यांची कारवॅन पर्यटन धोरणे जाहीर!

ज्यांना घरामध्ये राहायला आवडते पण बाहेरच्या विश्वाचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे; त्यांच्यासाठी कारवॅन योग्य पर्याय आहे. कारवॅन किंवा कॅम्पर व्हॅन प्रवाशांना सुरक्षित प्रवास देतात. अलीकडच्या काळात भारतातील पर्यटक कारवॅन गाडीचा वापर करतांना दिसून येत आहेत. कर्नाटक सरकारने 2020 मध्ये कारवॅन पर्यटन प्रकल्पासाठी परवानगी दिली. फेब्रुवारी 2021 मध्ये, महाराष्ट्राने कारवॅन पर्यटन धोरण जाहीर केले. ज्यामध्ये राज्यातील कॅम्पर व्हॅन किंवा कारवॅन पर्यटनासाठी मुबलक दरात उपलब्ध असल्याचे सांगितले. फेब्रुवारी 2022 मध्ये केरळने कोरोना महामारीनंतर पर्यटकांची मागणी आणि त्यांचा कम्फर्ट पूर्ण करण्यासाठी अनुकूल कारवॅन पर्यटन धोरण जाहीर केले. तसेच, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातही कारवॅन पर्यटन उपक्रमाचे उद्घाटन झाले. तर अशापद्धतीने भारतात कारवॅन पर्यटनाची मागणी वाढत आहे. तसेच त्यानुसार सरकार सोयीसुद्धा उपलब्ध करून देत आहे.


भारतात पुरेशा संख्येने कारवॅन पार्कचे बांधकाम करणे गरजेचे आहे. ज्यामुळे सुरक्षित ठिकाणी वाहने रात्रभर राहू शकतात. कारवॅन पर्यटन (प्रवास, विश्रांती आणि मुक्कामासाठी खास तयार केलेली वाहने) आणि कारवॅन पार्क्स (वाहने पार्क करण्यासाठी नियुक्त केलेली जागा जिथे पर्यटक विशिष्ट कालावधीसाठी त्याठिकाणी थांबू शकतात) अशा जागा उपलब्ध करून पर्यटन क्षेत्राला विकसित करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

कारवॅनद्वारे भटकंती आणि नवीन संस्कृतीचा शोध

ऑक्टोबर 2020 मध्ये देशातील आरामदायी प्रवासाचा अनुभव परवडणाऱ्या किमतीत अपग्रेड करण्याच्या उद्देशाने दिल्लीतील कारवाँ रेंटल स्टार्ट-अप, कारवा ट्रॅव्हलर्स प्रायव्हेट लिमिटेड सुरू करण्यात आला. दिल्लीतील जिग्यासू जोशी, हिमांशू जांगीड, योगेश कुमार आणि प्रणव शर्मा या चार मित्रांनी मिळून कारवाॅं इंडिया (Carvaa India) हा उपक्रम सुरु केला. त्यांना भटकंतीची आणि नवीन संस्कृतींचा शोध घेण्याची आवड आहे. सध्या, त्यांच्याकडे दोन कारवॅन आहेत; ज्यांचे बुकिंग आणि ट्रान्सफर अतिरिक्त शुल्कावर भारतात कुठेही केले जाऊ शकते.

किमान भाड्यामध्ये कारवॅन उपलब्ध

वेगवेगळ्या सोयी-सुविधांसह कारवॅन उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा कारवॅनही उपलब्ध आहेत. कारवॉं इंडिया किमान 3 व्यक्तींसाठी 5,500 प्रति-दिवस भाड्याने गाडी उपलब्ध करून देते. यात जीएसटी आणि ड्रायव्हरचे भाडे सुद्धा असते. तसेच 5 व्यक्तींसाठी 7,500 प्रति-दिवस आणि 7 व्यक्ती असतील तर 9,500 इतक्या दराने गाडी भाड्याने दिली जाते. डिझेल, राज्याचा कर आणि टोल टॅक्सचा भाड्यात समावेश होत नाही. ते प्रवाशांना भरावे लागते. 

कारवॅनला तरूणांसह ज्येष्ठांचाही वाढता प्रतिसाद

25 ते 34 वयोगटातील तरूणांचे बुकिंग जास्त प्रमाणात होत आहे. पण फक्त तरुण प्रवाशांनाच या प्रकारातील प्रवासात रस आहे, असे नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही कारवॅनचा प्रवास आवडत आहे. त्यांना ज्या सोयीसुविधा हव्या आहेत. त्या कारवॅनमधून उपलब्ध होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची या पर्यटन प्रकाराला पसंती मिळत आहे.  

कारवाॅं इंडियाची (Carvaa India) सुरूवात करण्यापूर्वी चार मित्रांमधील प्रणव शर्मा याने नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरण्याचा आनंद घेतला. त्यामुळे त्याला स्वत:ला कारवॅन पर्यटनाची कल्पना खूप आवडली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ची कारवॅन सेवा सुरू करण्याचा विचार केला होता. त्यावेळी त्यांच्या हेही लक्षात आले की, अशी सेवा देणाऱ्या फारच कमी कंपन्या आहेत. त्यामुळे या 4 मित्रांनी मिळून कारवॉँ इंडिया सुरू केली. तशी कारवॅन गाडी भाड्याने घेणे किंवा त्यात गुंतवणूक करणे हा एक वेगळा थरार आहे. प्रवासावर येणारा खर्च, हॉटेल आणि जेवणाचा खर्च आणि खर्च करूनही न मिळणाऱ्या किंवा कमी दर्जाच्या सेवा या सर्व गोष्टींचा विचार करूनच कारवॅनचा आनंद घेता येऊ शकेल.