पर्सनल लोनबद्दल अनेकांना काही प्रश्न पडतात. ते म्हणजे पर्सनल लोन ट्रान्सफर होते का? तसेच ट्रान्सफर केल्याने काही फायदे मिळतात का? तसेच EMI मध्ये काही बदल होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
जसे शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज यात लोन ट्रान्सफर करता येते तसेच वैयक्तिक कर्जात देखील लोन ट्रान्सफर करता येते. जेव्हा तुम्ही एका बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला ते दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याची सुविधाही दिली जाते. याला ‘बॅलन्स ट्रान्सफर’ (Balance Transfer) असे म्हणतात. यामध्ये, तुम्हाला वैयक्तिक कर्जाप्रमाणेच नवीन कर्जदार बँकेकडे कोणतीही तारण किंवा सुरक्षा जमा करण्याची गरज नाहीये. परंतु यासाठी तुम्ही ज्या बँकेकडून आधी पर्सनल लोन घेतलेले आहे त्या बँकेचे संमतीपत्र म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे. लोन ट्रान्सफर करताना ज्या बँकेत तुम्हाला लोन ट्रान्सफर करायचे आहे ती बँक शुल्क आकारते हे लक्षात घ्या.
बहुतेकदा लोन ट्रान्सफर करण्याचे मुख्य कारण हे स्वस्त व्याजदर हे असते. त्यामुळे यासोबत मिळणारे अन्य फायदे देखील जाणून घ्या.
पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा देणाऱ्या बँकांचा व्याजदर कमी असतो. अशा परिस्थितीत, जर तुमची थकबाकी जास्त असेल तर, शिल्लक हस्तांतरण केल्यावर, तुम्हाला कर्जावर कमी एकूण व्याज द्यावे लागू शकते. यासाठी एकदा बँक कर्मचाऱ्याशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घ्या. तसेच नव्या बँकेत तुमचे लोन ट्रान्सफर करताना कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी वाढवून घ्यायचा ऑप्शन देखील तुम्हांला मिळतो. यामुळे तुमचा EMI कमी होण्यास आणि तुमचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होऊ शकते. तासेक काही बँका अशा परिस्थिती तुम्हांला अतिरिक्त लोन देखील देऊ शकते, त्याची देखील माहिती घ्या.
काय आहे प्रोसेस?
पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या कर्जाचा सध्याचा व्याजदर आणि तुम्ही ज्या बँकेचे कर्ज हस्तांतरित करणार आहात त्या बँकेच्या व्याजदर याची तुलना करा. व्याजदर कमी असेल तरच लोन ट्रान्सफर करण्यात अर्थ आहे. अनेकदा तुम्ही जेव्हा अबंकेकडे याची विचारणा करता तेव्हा तुमची बँकच तुमचे व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करते. त्यांच्यासाठी ग्राहक महत्वाचे आहेत, त्यामुळे आपले ग्राहक इतर बँकेकडे जाऊ नयेत असे त्यांना वाटते. त्यामुळे बँक व्यवस्थापकाशी यावर चर्चा करा.
यानंतर, शिल्लक हस्तांतरण शुल्क इत्यादींबद्दल माहिती घ्या. कर्ज हस्तांतरित करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या बँकेकडून एनओसी आणि फोरक्लोजरचे कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. त्यांनतर तुमच्या नव्या बँकेने तुमच्या आधीच्या बँकेला कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमचे आधीचे बँक खाते बंद होऊ आणि नवीन बँकेत तुमचे लोन सुरु होईल.