अनेकदा घाईगडबडीत जीवन विमा पॉलिसीची खरेदी केली जाते. संबंधित पॉलिसीचे योग्य आकलन न करता केवळ टॅक्स वाचवण्यासाठी किंवा नातेवाईक, मित्रांच्या आग्रहाखातर खरेदी केलेली पॉलिसी ही कालांतराने फायदेशीर नसल्याचे लक्षात येते. संबंधित एजंट किंवा मित्र हा पॉलिसी खरेदीचे फायदे सांगतो आणि आपणही संबंध टिकवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवत पॉलिसी खरेदी करतो. ते आपल्या आवडीची पॉलिसी विकतात. पण ती फायद्याची असतेच असे नाही.
- आजकाल विमा कंपन्यांकडून फोनवरुन पॉलिसी विक्रीबाबत विनंती येत असते. कंपनीचा एक्झिक्युटिव्ह हा एखाद्या विशिष्ट पॉलिसी खरेदीचे फायदे सांगतो. आपणही त्याच्या बोलण्याला हुरळून जातो. परंतु पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला खरेदीच्या वेळी दिलेली माहिती आणि विद्यमान पॉलिसी यात बराच फरक असल्याचे लक्षात येते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
- आपल्या माथी भलतीच पॉलिसी मारण्यात आली असेल तर निराश होऊ नका. विमा कंपनी पॉलिसीची विक्री केल्यानंतर ग्राहकांना पंधरा दिवसाचा फ्री लूक पीरियडची सुविधा देते. त्याचा कालावधी पॉलिसी डॉक्युमेंट मिळाल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंतचा असतो. या काळात पॉलिसीची सर्व माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. विम्याची रक्कम, पॉलिसीचा कालावधी, हप्त्याची रक्कम आदी. आपण या गोष्टीबाबत समाधानी असाल तर पॉलिसी सुरू ठेवू शकता. जर पॉलिसीचे नियम आणि अटी आपल्यासाठी संयुक्तिक वाटत नसेल तर पॉलिसी रद्द करु शकता.
- पॉलिसी रद्द केल्यास विमा कंपनी पॉलिसीशी निगडीत काही खर्च वगळून हप्त्याची उर्वरित रक्कम आपल्याला परत देते. यात पॉलिसी धारकाच्या वैद्यकीय चाचणीवर झालेला खर्च, स्टँप ड्यूटीचा खर्च, पॉलिसी धारकाच्या पॉलिसी कव्हरचा खर्च देखील सामील असतो. याशिवाय आपण कोणतीही पॉलिसी खरेदी करत असाल आणि त्याबाबतीत समाधानी नसाल तर पॉलिसी रद्द करु शकता.