Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bumble Bee Flights : देशातल्या पहिल्या एअर-टॅक्सी सेवेसाठी 300 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक

Bumble Bee Flights

Bumble Bee Flights : या बंगळुरूतल्या स्टार्ट-अपने देशात पहिली एअर-टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. आणि त्यासाठी ओडिशामध्ये प्लांट सुरू करण्याचा कंपनीचा विचार होता. त्यासाठी कंपनीला 300 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे

बंबल-बी फ्लाईट्स (Bumble Bee Flights) या देशातल्या पहिल्या हवाई मार्गाने प्रवास करू शकणाऱ्या टॅक्सी सेवेसाठी (Air Taxi) तब्बल 300 कोटी रुपयांची परकीय मदत मिळाली आहे. या पैशातून ओडिशा राज्यात बंबल बी टॅक्सीचा असेंबल्ली प्लांट (Assembly Plant) बनवण्याची कंपनीची योजना आहे.

बंबल-बी (Bumble Bee Taxi) ही टॅक्सी सेवेसाठीची एक अभिनव कल्पना आहे. या टॅक्सी हवेतून चालतात. आणि रस्त्यावरूनही चालू शकतात. शहरी भागातल्या रहदारीवर उपाय म्हणून अनेक प्रगत देशांमध्ये अशी टॅक्सी सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात असा प्रयत्न केलाय बंगळुरूतले एक अभियंता आणि हवाई प्रवास क्षेत्रातले एक तज्ज्ञ अर्जुन दास यांनी 2022च्या सुरुवातीला बंबल बी फ्लाईट्स नावाने एक स्टार्ट अप कंपनी सुरू केली.

त्यांची ही कल्पना युकेस्थित कंपनी SPAM & MRAM टेक्नॉलॉजीज् या कंपनीने आता उचलून धरली आहे. त्यांनी दास यांच्या कंपनीत 300 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.

या पैशातून ओडिशा इथं टॅक्सींसाठी कारखाना उभारण्याचा दास यांचा मानस आहे. आपली टॅक्सी सेवा एप्रिल 2023 पर्यंत सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

या टॅक्सींना बी फ्लाईट्स म्हटलं जाईल. आणि भारतात त्यांचं उत्पादन 2024 पासून सुरू होईल. इतकंच नाही तर बी टॅक्सी हा सौरऊर्जेवर चालणाऱ्या असतील. आणि त्यासाठी फक्त 300 किलो वजनांच्या बॅटरीची गरज पडेल. हेलिकॉप्टरमल्या बॅटरी या 1000 किलो वजनाच्या असतात. तुलनेनं बंबल बी टॅक्सी किफायतशीर असतील.

सध्या तयार होत असलेल्या बी टॅक्सीमध्ये एक माणूस आपल्याबरोबर एकादी सुटकेस घेऊन प्रवास करू शकेल. अगदी इमारतींच्या गच्चीवरही या टॅक्सी उतरू शकतील. या टॅक्सी 20 मिनिटांत 20 किलोमीटरचं अंतर कापू शकतील. 

या टॅक्सीचं उत्पादन बंबल बी कंपनीला आपल्याकडे ठेवायचं आहे. आणि जागतिक स्तरावर ही सेवा चालवण्यासाठी विविध देशांमध्ये सहकार्य करार किंवा भागिदारी करण्याची त्यांची योजना आहे. 
लवकरच भारत, अमेरिका, युके, युएई आणि सिंगापूर या देशांमध्ये या टॅक्सी सेवेला सरकारी मान्यता मिळेल असा अंदाज आहे. 
‘eVTOL (Electric Verticla Take-off & Landing) हे जगभरातल्या टॅक्सी सेवांचं भविष्य आहे. शहरांमध्ये रस्ते वाहतुकीवर असलेला ताण त्यामुळे कमी होऊ शकेल. आणि महत्त्वाचं म्हणजे सौरऊर्जेवर चालणाऱ्या या टॅक्सी कार्बन उत्सर्जनही आटोक्यात ठेवतील,’ असं अर्जुन दास मीडियाशी बोलताना म्हणाले.

या टॅक्सीचा उपयोग सांगताना दास म्हणाले, ‘फक्त मानवी वाहतूकच नाही तर अँब्युलन्स सेवा, एअर टॅक्सी आणि सामानाच्या वाहतुकीसाठीही ही टॅक्सी वापरता येईल. त्याचं डिझाईन तसंच बनवण्यात आलंय.’
जगभरात एअर टॅक्सी सेवेवर अनेक कंपन्या काम करत आहेत. पण, भारतातला अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. मॉर्गन स्टॅनले कंपनीच्या अंदाजानुसार, येणाऱ्या दिवसांमध्ये एअर टॅक्सी उद्योगाची बाजारपेठ 2040 पर्यंत 1.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल. या टॅक्सीचं बुकिंग ओला किंवा उबर सारखं ऑनलाईन करता येईल.