2023 चा अर्थसंकल्प (Union Budget 2023) 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. गेल्या वेळेप्रमाणे हा अर्थसंकल्पही पेपरलेस (Paperless Budget) असणार आहे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 2014 पूर्वी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प वेगवेगळा मांडला जात होता. परंतु मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही अर्थसंकल्प एकत्रितपणे मांडण्याचा पायंडा पाडला गेला. रेल्वेतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. जगातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे भारतात पसरले आहे, त्यामुळे जनसामान्य रेल्वेबद्दल अर्थसंकल्पात काय सुधारणा आणि घोषणा होतात हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
Table of contents [Show]
प्लॅटफॉर्म तिकिटाचे (Platform Ticket Rates) दर कमी करण्याची मागणी!
ANI या वृत्तसंस्थेने पाटणा जंक्शन आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अनेक प्रवाशांना अर्थसंकल्पाबाबत त्यांच्या अपेक्षा आणि यावेळी त्यांना काय हवे आहे हे विचारले. यावेळी रेल्वेचे भाडे वाढवू नये, अशी या बऱ्याच प्रवाशांनी मागणी केली. गेल्या काही वर्षात झालेली रेल्वे भाडेवाढ नियंत्रणात आणली पाहिजे असेही लोकांचे म्हणणे आहे. यासोबतच प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपयांवरून 10 रुपये करण्यात यावी या मागणीवर लोकांनी जोर दिला आहे.
#MondayMotivation#PMVision4Railways pic.twitter.com/MZh9ZtR2t5
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 30, 2023
प्रत्येक राज्यातून 'वंदे भारत' ट्रेन हवी
'वंदे भारत' आणि 'बुलेट ट्रेन' प्रकल्पांबाबत प्रवाशांनी सांगितले की, वंदे भारतसारख्या ट्रेन देशातील प्रत्येक राज्यातील राजधानीतून धावल्या पाहिजेत. यासोबतच बुलेन ट्रेन लवकर सुरू करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्रासाठी 'वंदे भारत' ट्रेनबाबत महत्वाची बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई ते साईनगर, शिर्डी आणि सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई अशा दोन वंदे भारत एक्प्रेस चालवल्या जाणार आहेत. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर 10 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाणार आहे.
रेल्वे स्वच्छतेकडे दिले जावे विशेष लक्ष
रेल्वेला अजूनही स्वच्छतेकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. या दिशेने आणखी काम व्हायला हवे. कोरोनाच्या वेळी बंद पडलेल्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी देखील प्रवाशांकडून करण्यात आली आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा स्वच्छतेच्या तक्रारी येत असतात, त्याचे वेळीच निराकरण होणे गरजेचे आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सोशल मिडीयाच्या जमान्यात ट्वीटर आणि फेसबुकवरून अनेक लोक स्वच्छतेबाबत तक्रारी करताना दिसतात, रेल्वे प्रशासन याची दखल घेत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा देखील प्रयत्न करताना दिसतात.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज
महिला प्रवाशांची सुरक्षा आणि स्वच्छतेला बजेटमध्ये ठळकपणे स्थान दिले पाहिजे अशी मागणी काही प्रवाशांनी केली आहे. तसेच अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी सरकारने तंत्रज्ञानावर अधिक गुंतवणूक करावी अशी अपेक्षा देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे.